नाशिक विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत साध्वी चौधरी पुन्हा अव्वल!
६९ किलो वजनी गटात १६० किलो वजन उचलत सुवर्णपदकाची कमाई; अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
वजन उचलण्याच्या खेळात ताकद, तंत्र, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथील राष्ट्रीय खेळाडू कु. साध्वी प्रल्हाद चौधरी हिने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ६९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या शानदार कामगिरीच्या बळावर साध्वीची अमरावती येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्पर्धेत १६० किलो वजन उचलले
साध्वीने विभागीय स्पर्धेत स्नॅच प्रकारात ७५ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात ८५ किलो, असे एकूण १६० किलो वजन उचलून अव्वल स्थान मिळविले. तिच्या या दमदार कामगिरीने पुन्हा एकदा तिची मेहनत, सरावातील सातत्य आणि स्पर्धात्मक क्षमता अधोरेखित झाली आहे.
यापूर्वी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतही साध्वीने ६९ किलो वजनी गटात एकूण १४० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळविला होता. जिल्हास्तरीय यशानंतर विभागीय स्तरावरही तिने आपली कामगिरी उंचावत सुवर्णपदक पटकावले.
राष्ट्रीय स्तरावरही सुवर्णपदकांची कमाई
साध्वी चौधरी हिने यापूर्वी दोन वेळा शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत, तसेच एकदा वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या यशानंतर विभागीय स्पर्धेतही तिने अव्वल स्थान कायम राखल्याने तिच्या क्रीडाप्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
तिच्या या यशामागे आई-वडील प्रल्हाद चौधरी व मीनाक्षी चौधरी यांचे प्रोत्साहन आणि विद्यालयातील मार्गदर्शकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पर्यवेक्षक तथा आदर्श क्रीडा शिक्षक बी. डी. साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. रघुनाथ अरविंद पाटील आणि राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यालयाच्या वतीने अभिनंदन
साध्वीच्या यशाबद्दल कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब प्रतापराव पाटील, उपाध्यक्षा डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव दादासाहेब प्रशांतराव पाटील, प्राचार्य आर. आर. वळखंडे, पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रभारी कार्यवाहक मनोजकुमार पवार यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.
आता अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत साध्वी कशी कामगिरी करते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे गो.पु. पाटील विद्यालयाच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला असून, राज्यस्तरावरही ती पदक मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
