शिंदी येथे सुरक्षा नवदुर्गा मंडळाचा नवरात्रोत्सव उत्साहात!
श्री कालका माता देवीची विधिवत स्थापना; चेतन चौधरी व पूजा चौधरी दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना
शिंदी, ता. भुसावळ | संघरत्न सपकाळे
भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध व जुने सुरक्षा नवदुर्गा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. श्री कालका माता देवीच्या स्थापनेने उत्सवाला सुरुवात झाली असून, परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौधरी दाम्पत्याच्या हस्ते विधिवत घटस्थापना
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळात श्री कालका माता देवीची स्थापना करण्यात आली. यावर्षी घटस्थापनेचा मान चेतन चौधरी आणि सौ. पूजा चौधरी या दाम्पत्याला मिळाला. त्यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यावेळी विधिवत पूजा-अर्चा करून देवीचा जयघोष करण्यात आला.
मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे परिश्रम
सुरक्षा नवदुर्गा मंडळ हे परिसरातील जुने मंडळ असून, अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवाचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष गणेश पाटील, निलेश कोळी (महसूल सेवक), विलास पाटील, विशाल महाले, कांचन राजपूत, धना भिरुड, पंकज कुंभार आणि धनराज पाटील यांच्यासह सर्व सदस्य उत्सवाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत.
नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी श्री कालका माता देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरक्षा नवदुर्गा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
