Spread the love

परभणी जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपासून विशेष आर्थिक समावेशन मोहीम!

प्रत्येक गावात बँकिंग शिबिरांचे आयोजन; विमा, पेन्शन, केवायसी आणि आधार जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर

डिजिटल बँकिंग सुरक्षिततेबाबत जनजागृती; पात्र नागरिकांनी मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

परभणी, प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते

केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष आर्थिक समावेशन मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला बँकिंग सेवांशी जोडणे, शासकीय विमा व पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देणे आणि डिजिटल बँकिंगबाबत सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात बँकिंग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

जिल्हा प्रशासन, जिल्हा अग्रणी बँक कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व बँकांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. बँकिंग सुविधांपासून वंचित नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे, बँक खात्यांशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

विमा व पेन्शन योजनांच्या नोंदणीला प्राधान्य

या मोहिमेदरम्यान प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांमध्ये पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच संबंधित विमा योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे पात्र नागरिकांना विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळविणे सुलभ होणार आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत नवीन बँक खाती उघडणे, निष्क्रिय झालेली जनधन खाती पुन्हा कार्यरत करणे आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहातील कुटुंबांना बँकिंग सेवांशी जोडणे, यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

केवायसी आणि नामनिर्देशनाची कामे पूर्ण करा

बँक खात्यांचे पुनःकेवायसी पूर्ण करणे, प्रलंबित खात्यांसाठी केंद्रीय केवायसी ओळख क्रमांक निर्माण करणे आणि बचत खाती, लॉकर तसेच इतर बँकिंग सुविधांमधील नामनिर्देशनाचे तपशील अद्ययावत करणे, यासाठी शिबिरांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या माध्यमातून बँक खात्यांशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करण्यास नागरिकांना मदत होईल. पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी कमी करण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न आहे.

डिजिटल बँकिंग सुरक्षिततेबाबत जनजागृती

डिजिटल आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी, पिन, पासवर्ड आणि सीव्हीव्ही यांची गोपनीयता राखण्याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले जाणार आहे.

तसेच संशयास्पद लिंक, अनोळखी फोन कॉल आणि फसवणूक करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षिततेबाबत नागरिकांना जागरूक करून सायबर आर्थिक फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नागरिकांनी बँकिंग शिबिरांचा लाभ घ्यावा

परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत आपल्या बँक खात्याचे पुनःकेवायसी, आधार जोडणी, केंद्रीय केवायसी ओळख क्रमांक, नामनिर्देशन तसेच विमा व पेन्शन योजनांमधील नोंदणीसंदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत. आपल्या गावात आयोजित करण्यात येणाऱ्या बँकिंग शिबिरांमध्ये सहभागी होऊन या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा अग्रणी बँक कार्यालय, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version