तामसवाडी-बोरी धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तने द्या!
पिण्याच्या पाण्यासह जनावरे आणि रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी; शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
पारोळा, प्रतिनिधी : सुरेश पाटोळे
यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने खरीप हंगामावर विपरीत परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तामसवाडी-बोरी मध्यम प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच सिंचनासाठी तीन आवर्तने द्यावीत, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन दिले.
कमी पावसामुळे शेतकरी संकटात
राज्यातील पर्जन्यमान प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असते. मात्र, हवामानातील बदलांमुळे पावसाचे प्रमाण, कालावधी आणि वितरण यामध्ये अनिश्चितता वाढत आहे. यंदा सुरुवातीपासूनच अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार पाण्याचे नियोजन करण्याची मागणी
जलसंपदा विभागाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत संघटनेने उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याची गरज अधोरेखित केली आहे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि अन्य आवश्यक गरजांची पूर्तता केल्यानंतर उपलब्धतेनुसार शेतीसाठी पाणी मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिल्लक जलसाठ्याचा विचार करून कमी पाणी लागणाऱ्या रब्बी हंगामी पिकांना तसेच जनावरांसाठी आवश्यक चारा पिकांना प्राधान्य द्यावे. तामसवाडी-बोरी धरणातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन सिंचनासाठी तीन आवर्तने देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे संघटनेने म्हटले आहे.
पाण्याचे वेळापत्रक निश्चित करण्याची मागणी
धरणातून पाणी सोडताना सिंचन क्षेत्र, आवर्तनाची वेळ आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करावे. उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य सिंचन पद्धतींचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याची गरज आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कायम राखून शेतीला आवश्यक तेवढे पाणी मिळाल्यास रब्बी हंगामातील पिकांना आधार मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने धरणातील जलसाठा आणि संभाव्य पाणीगरज यांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित
तहसीलदार उल्हास देवरे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, गुलाब पाटील, रवींद्र पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, जुलाल पाटील, पंढरीनाथ पाटील, भारत पाटील, निंबा पाटील, राहुल पाटील, लालचंद पाटील, मुरलीधर पाटील, नामदेव पाटील, अरविंद पाटील, यशवंत पाटील भंडारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
