डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
आमदार सुहास कांदे यांची उपस्थिती; नांदगाव तालुक्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि चारा प्रश्नांवर चर्चा
प्रज्ञानंद जाधव
नांदगाव प्रतिनिधी
मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. नांदगावचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनीही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “डॉ. कलाम हे युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार आजही देशाला दिशा देणारे आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
नांदगावच्या दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न ऐरणीवर
अभिवादन कार्यक्रमानंतर आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेली पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी आमदार कांदे यांनी पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू करणे, चारा छावण्या उभारणे आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
या मागण्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर शासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
