Spread the love

विज्ञानासोबत अध्यात्म आणि संस्कारांची सांगड घाला; मोबाईलचे गुलाम बनू नका!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; भादली येथे तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन, १३१ वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन

जळगाव / पाळधी, दि. १६ | प्रतिनिधी

“विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतानाच अध्यात्म आणि चांगल्या संस्कारांची सांगड घालावी. मोबाईलचा उपयोग ज्ञान आणि मार्गदर्शनासाठी करा; मात्र त्याचे गुलाम बनू नका. मोठी स्वप्ने पाहा, अपयशाने खचू नका आणि सातत्याने प्रयत्न करा. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीचा संदेश घराघरांत पोहोचवा,” असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभाग आणि महात्मा गांधी विद्यालय, भादली बु. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२६–२७ चे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकूण १३१ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून उद्याच्या भारताची पायाभरणी

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांचे छोटे-छोटे प्रयोग हीच उद्याच्या प्रगत भारताची पायाभरणी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि कल्पकता असून, योग्य संधी मिळाल्यास गावातील विद्यार्थीही जगाला उपयोगी पडणारा शोध लावू शकतो.

आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे सी. व्ही. रमण आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम दडलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रयोगशील बनवावे. विद्यार्थ्यांनी ‘मला जमणार नाही’ हा विचार मनातून काढून टाकावा, अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने प्रयत्न करावेत आणि जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत त्यांनी सहभागी बालवैज्ञानिकांचे अभिनंदन केले. प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल शिक्षण विभाग, आयोजक आणि शिक्षकांचेही कौतुक केले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचा संदेश द्या

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन केले. पाण्याचा काटकसरीने वापर, पाण्याची बचत आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी. विज्ञानातील नवकल्पनांचा उपयोग समाजाच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी व्हावा आणि पर्यावरण संवर्धनासाठीही विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.

विज्ञान प्रदर्शनातून संशोधनवृत्तीला चालना

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विशद केले. विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या उपजत जिज्ञासेला, कल्पकतेला आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत नावीन्यपूर्ण प्रयोगांतून आपली गुणवत्ता आणि सर्जनशीलता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.

१३१ वैज्ञानिक उपकरणांची मांडणी

भादली येथील या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकूण १३१ वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, प्रयोगशाळा सहायक आणि परिचर यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना, प्रयोगशीलता आणि नव्या कल्पना पाहण्याची संधी या प्रदर्शनातून उपस्थितांना मिळाली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्रा. जगन्नाथ दरंदरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत, रूरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव उमाकांत जावळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र संपकाळे, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, संचालक प्रकाश अत्तरदे व गोपाळ ढाके, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिचोले, विजय पवार व अलाउद्दीन शेख, महापालिकेचे प्रशासन अधिकारी खलील शेख, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड आणि पर्यवेक्षक पी. जी. बागुल उपस्थित होते.

यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यासोबतच त्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका पौर्णिमा पाटील यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक पी. जी. बागुल यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version