Spread the love

शेतकऱ्याच्या बांधापर्यंत विकास पोहोचवणे हीच प्राथमिकता!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन; पोखरी–पाळधी शिवारात १४.०९ लाखांच्या शेतरस्त्याचे भूमिपूजन

युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या विशेष नियोजनातून एक किलोमीटरचा रस्ता मार्गी; शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा

पाळधी/धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी, दि. १७

“शेतकरी वर्षभर ऊन, वारा आणि पाऊस सहन करून शेतात राबतो. मात्र, स्वतःच्या शेतात जाण्यासाठीही त्याला चिखलातून वाट काढावी लागते, ही परिस्थिती बदलली पाहिजे. शेतीसाठी पाणी आणि विजेइतकाच शेतापर्यंत जाणारा चांगला रस्ताही महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याचा वेळ, श्रम आणि खर्च वाचवून शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी जिल्ह्यातील शेतपाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत विकास पोहोचवणे हीच आपली प्राथमिकता आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील पोखरी–पाळधी शिवारात मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेंतर्गत १४ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या एक किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

प्रतापराव पाटील यांच्या नियोजनातून रस्त्याचे काम मार्गी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विशेष नियोजनातून या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. रामेश्वर सोमाणी यांच्या शेतापासून रत्नाकर पंडित यांच्या शेतापर्यंत हा एक किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत मिळणार आहे. तसेच ट्रॅक्टर, शेतीची अवजारे आणि शेतीमालाची वाहतूक अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या शेतरस्त्याच्या समस्येवर या कामामुळे तोडगा निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

शेतपाणंद रस्त्यांना प्राधान्य देणार

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासात शेतरस्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शेतापर्यंत चांगला रस्ता उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय कमी होते, वाहतुकीचा खर्च वाचतो आणि शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवणे सोपे होते. त्यामुळे शेतपाणंद रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल आणि या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

योजनेची तहसीलदारांकडून माहिती

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची तसेच संबंधित रस्त्याच्या कामाची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा कामांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, शाखा अभियंता विशाल पाटील, वीरेंद्र पाटील, माजी सरपंच भागवत पाटील, माजी सभापती मुकुंदराव ननवरे, गजानन पाटील, नवल पारधी, महेंद्र पारधी, उपसरपंच अनिल कासट यांच्यासह तलाठी, परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव ननवरे यांनी केले, तर आभार नवल पारधी यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version