Spread the love

चंद्रपूर दीक्षाभूमीवर जनसेवेचा वसा; आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा स्तुत्य उपक्रम!

‘आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’तर्फे दोन दिवस सेवा; लाखो अनुयायांसाठी पाणी आणि माहितीपत्रकांचे वाटप

पुणे | विशेष प्रतिनिधी : एस. एन. नांदेडकर

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजित दोन दिवसीय सोहळ्यात ‘आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ (महाराष्ट्र राज्य, जिल्हा चंद्रपूर) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. चळवळीचे मुख्य संयोजक आयुष्यमान संदेश शालिनी संभाजी कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून अनुयायांना चळवळीच्या ध्येय-उद्दिष्टांची माहिती देणारी पत्रके आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. गर्दीने गजबजलेल्या दीक्षाभूमीवर या उपक्रमातून कार्यकर्त्यांनी जनसेवेचा वसा जपला.

१५ ऑक्टोबर रोजी पंजाब येथील बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक आणि उच्चशिक्षित विचारवंत आयुष्यमान सोहनलालजी गिड्डा यांच्या हस्ते फीत कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजसेवक आयुष्यमान दिलीप वावरे, सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान मधुकर वानखेडे आणि त्वचारोगतज्ज्ञ आयुष्यमान डॉ. प्रकाश रामटेके प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.

चळवळीची भूमिका आणि आगामी उपक्रमांची माहिती

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आयुष्यमान रीता रामटेके यांनी प्रास्ताविकातून चळवळीची भूमिका, ध्येय-उद्दिष्टे आणि भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. तसेच अंकुश बळीराम सोनवणे प्रकाशक असलेल्या ‘एबीएल (ABL) प्रकाशना’तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या ‘शब्दांची चळवळ’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची माहितीही त्यांनी दिली.

यानंतर प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान सोहनलाल गिड्डा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञांच्या धर्तीवर संपूर्ण देशात २२ शाळा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षणाच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तन घडविणे आणि समाजात प्रबोधनाची चळवळ व्यापक करणे यांसारख्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

आयुष्यमान दिलीप वावरे आणि आयुष्यमान मधुकर वानखेडे यांनी चळवळीच्या संकल्पनेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक प्रबोधनाबरोबरच प्रत्यक्ष जनसेवेचे महत्त्वही या उपक्रमातून अधोरेखित झाले.

दोन दिवस पाणी आणि माहितीपत्रकांचे वाटप

दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांची मोठी गर्दी लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी सलग दोन दिवस पिण्याचे पाणी आणि चळवळीच्या माहितीपत्रकांचे वाटप केले. या उपक्रमामुळे चळवळीचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच उपस्थित अनुयायांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला.

धम्म, प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सामाजिक चळवळीची उद्दिष्टे केवळ विचारांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या सेवाकार्यातून दिसून आला.

कार्यकर्त्यांचे परिश्रम; सहकाऱ्यांचे योगदान

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हरिचंद्र अलोणे यांनी केले, तर राजपाल जवादे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे आयोजन आणि दोन दिवसीय सेवाकार्य यशस्वी करण्यासाठी सुषमा प्रकाश रामटेके, स्नेहा फुलझेले, पृथ्वी गायकवाड, पौर्णिमा गेडाम, राष्ट्रपाल वाटोरे, सुकेषण रामटेके, नितेश रावलकर, संतोष गोंगले, महेश गायकवाड, बादल अलोणे, आशिष रामटेके, वैशाली पेटकर, जानिया सवाईमूल तसेच आय.टी.आय.च्या विद्यार्थिनींनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमाला स्वाती राहुल चव्हाण, अंकुश बळीराम सोनवणे, समाधान मस्के, ज्योती कांबळे, राणी मेश्राम, नीतीषा सवाईमुल, जयेश सोळंकी आणि शुभांगी गुरचळ यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून दीक्षाभूमीवरील हा सेवाभावी उपक्रम यशस्वी झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version