Spread the love

मंगलदीप सिताफुले यांचा ‘महाराष्ट्ररत्न पुरस्कार–२०२६’ने गौरव!

सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि जनसेवेची दखल; ‘दै. श्रमिक लोकराज्य’ कार्यालयात विशेष सत्कार

पुणे | प्रतिनिधी : एस. एन. नांदेडकर

सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील आलूर येथील मंगलदीप शांताबाई नागनाथ सिताफुले यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. पुणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना ‘महाराष्ट्ररत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या सन्मानानिमित्त पुण्यातील दैनिक श्रमिक लोकराज्य कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.

आईच्या संस्कारांना पुरस्कार समर्पित

आई शांताबाई यांच्या संस्कारांतून मिळालेली सेवेची प्रेरणा आणि माणुसकीची शिकवण प्रत्यक्ष कृतीत उतरवत मंगलदीप सिताफुले यांनी समाजोपयोगी कार्याची वाट निवडली. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान आपल्या आईच्या त्यागाला, प्रेमाला आणि संस्कारांना आदरपूर्वक समर्पित केला. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी त्यांची ही भावना उपस्थितांच्या दृष्टीने विशेष ठरली.

‘दै. श्रमिक लोकराज्य’ कार्यालयात गौरव

मंगलदीप सिताफुले यांच्या यशाची दखल घेत दैनिक श्रमिक लोकराज्यच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दैनिक श्रमिक लोकराज्यचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड आणि पुणे प्रतिनिधी तथा प्राचार्य संघशील भद्रे (एस. एन. नांदेडकर) यांच्या हस्ते त्यांना शाल, पुष्पहार आणि त्यांच्या आईच्या आठवणींवर आधारित दैनिक श्रमिक लोकराज्यतर्फे प्रकाशित करण्यात आलेला ‘तू माझी आई झालास रे बाळ’ हा विशेष लेख देऊन सन्मानित करण्यात आले.

या सत्कारातून त्यांच्या सामाजिक कार्याबरोबरच आईविषयीची कृतज्ञता आणि भावनिक नाते यांचाही गौरव करण्यात आला. आईच्या संस्कारांची शिदोरी घेऊन समाजासाठी कार्य करण्याचा त्यांचा दृष्टिकोन प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सामाजिक कार्यासोबत साहित्य क्षेत्रातही योगदान

मंगलदीप सिताफुले हे नवोदित कवी, लेखक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, गरजूंची सेवा आणि साहित्याच्या माध्यमातून विचारांची अभिव्यक्ती अशा विविध क्षेत्रांत त्यांच्याकडून कार्य घडत आहे.

‘महाराष्ट्ररत्न पुरस्कार–२०२६’मुळे त्यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, आगामी काळातही त्यांच्या हातून उल्लेखनीय सामाजिक आणि साहित्यिक कार्य घडत राहो, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version