दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याला मोठा धक्का! शिरडाणे प्र. डांगरी येथे ३ लाख ४ हजारांची घरफोडी
कापूस विक्रीतून मिळालेली रोकड कपाटातून लंपास; दुष्काळाच्या संकटात शेतकरी प्रल्हाद पाटील यांना आर्थिक फटका
धुळे | प्रतिनिधी
धुळे तालुक्यातील शिरडाणे प्र. डांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकरी प्रल्हाद भिका पाटील यांच्या घरात घरफोडी करून कपाटात ठेवलेली ३ लाख ४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. आधीच पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दिवाळीच्या तोंडावर मोठा आर्थिक फटका बसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कापूस विक्रीतून मिळालेली रक्कम चोरीला
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी प्रल्हाद पाटील यांनी १५ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतातील कापूस व्यापाऱ्याला विकला होता. या विक्रीतून मिळालेली ३ लाख ४ हजार रुपयांची रक्कम त्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील कपाटात सुरक्षित ठेवली होती. मात्र, त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील संपूर्ण रोकड चोरून नेली.
दुष्काळात दिवाळीपूर्वीच आर्थिक संकट
यंदा पावसाअभावी शेतीचे गणित बिघडल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कष्टाने पिकवलेल्या कापसाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम चोरीला गेल्याने पाटील कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दिवाळीच्या सणासाठी आणि घरखर्चासाठी उपयोगी पडणारी रक्कम हातातून गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रल्हाद पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, रोकड लंपास करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
