Spread the love

चारा टंचाईवर मात करण्यासाठी पाळधीत ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’

पशुसंवर्धन विभाग व जीपीएस फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; तज्ज्ञांचे मार्गदर्शन, रब्बी चारा बियाण्यांसाठी पात्र शेतकऱ्यांची नोंदणी

पाळधी/धरणगाव/जळगाव, प्रतिनिधी | दि. १८

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन, उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाळधी येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सालय, पाळधी आणि जीपीएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभियानात पशुपालकांना चारा टंचाईवरील उपाययोजना, चारा संवर्धन आणि पशुधन व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी रब्बी हंगामातील चारा बियाण्यांसाठी पात्र शेतकऱ्यांची प्रत्यक्ष नोंदणीही करण्यात आली.

चारा व पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन

युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा व पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पशुपालकांनी उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. चारा टंचाईच्या काळात जीपीएस फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावागावांत जनजागृती करून शासकीय योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुरघास, हायड्रोपोनिक चारा उत्पादनावर मार्गदर्शन

जळगावचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी मुरघास निर्मिती, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन आणि चारा टंचाईवरील पर्यायी उपाययोजनांची माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविण्याच्या पद्धतींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास जाधव यांनी चारा नियोजन आणि पशुधन व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली. धरणगावचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अशोक महाजन यांनी प्रास्ताविकातून तालुक्यातील सद्यस्थिती आणि अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल शिंदे आणि डॉ. जे. एस. नारखेडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साळुंखे यांनी केले.

मका पिकापासून मुरघास निर्मितीची माहिती

बांभोरी येथील पशुखाद्य उद्योजक योगेश पाटील यांनी सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून मका पिकापासून बेलर मशीनच्या साहाय्याने मुरघास कसा तयार केला जातो, याची माहिती दिली. चाऱ्याची उपलब्धता मर्यादित असताना मुरघास निर्मितीमुळे चाऱ्याचे नियोजन आणि साठवणूक कशी करता येते, याबाबतही त्यांनी माहिती दिली.

यावेळी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पात्र शेतकऱ्यांकडून रब्बी चारा बियाण्यांसाठी गुगल फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्यांची प्रत्यक्ष नोंदणी करण्यात आली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिश्रम

अभियान यशस्वी करण्यासाठी पाळधीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन भालेराव, पिंपरीचे डॉ. गौरव सूर्यवंशी, जळगावचे डॉ. विकास इंगळे, पशुधन पर्यवेक्षक राहुल साळुंखे, रमेश कुवर, गणेश पाटील, सतीश वैष्णव, जितेंद्र साळुंखे, गोकुळ साळुंखे आणि गौरव सुशीर यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जीपीएस फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनीही सहकार्य केले. या अभियानाला पाळधी व परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version