Spread the love

भुसावळच्या वडापाव विक्रेत्याला धनादेश अनादर प्रकरणात एक वर्षाची शिक्षा

३ लाख ४० हजारांचा धनादेश वटला नाही; न्यायालयाकडून ६ लाख ८० हजार रुपये दंड, रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास

संघरत्न सपकाळे | भुसावळ

धनादेश अनादर प्रकरणात भुसावळ येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपी मनोज भालचंद्र चौधरी यांना एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट म्हणजेच ६ लाख ८० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. बगे यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल घोषित केला.

स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून वाद

या प्रकरणातील फिर्यादी संजय काशिनाथ अहिरे, रा. जुना सातारा, भुसावळ, यांनी आपले मित्र मनोज भालचंद्र चौधरी, रा. पांडुरंग टाकीसमोर, जामनेर रोड, भुसावळ यांच्याशी सन २०१६ मध्ये स्थावर मालमत्तेचा ९ लाख ६० हजार रुपयांचा तोंडी सौदा केला होता. या व्यवहारापोटी अहिरे यांनी ३ लाख ४० हजार रुपये बयाणा रक्कम दिली होती.

काही कालावधीनंतर तांत्रिक कारणामुळे दोघांनी हा व्यवहार रद्द केला. त्यानंतर चौधरी यांनी बयाण्याची रक्कम परत करण्यासाठी अहिरे यांना ३ लाख ४० हजार रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश नमूद तारखेला निश्चितपणे वटेल, असे आश्वासनही देण्यात आले होते.

अपुऱ्या शिलकीमुळे धनादेश अनादरित

संजय अहिरे यांनी संबंधित धनादेश बँकेत वटवण्यासाठी जमा केला असता, खात्यात अपुरी रक्कम असल्याने तो अनादरित होऊन परत आला. त्यामुळे अहिरे यांनी भुसावळ येथील प्रथमवर्ग न्यायालयात मनोज चौधरी यांच्याविरुद्ध संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक ९३/२०१७ दाखल केला.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या बचावातील कथन आणि पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने निर्णय दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. बगे यांनी आरोपीला एक वर्षाची साधी कैदेची शिक्षा आणि ६ लाख ८० हजार रुपये दंड सुनावला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगण्याचेही आदेश देण्यात आले.

फिर्यादी पक्षातर्फे वकिलांचा युक्तिवाद

या प्रकरणात फिर्यादी संजय अहिरे यांच्यातर्फे भुसावळ येथील ॲड. राजेश एस. उपाध्याय यांनी काम पाहिले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version