Spread the love

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ओम श्रीराम चौधरीची कांस्यपदकाला गवसणी!

७० व्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक; गो.पु. पाटील विद्यालयाच्या क्रीडा यशात मानाचा तुरा

भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ

कुस्तीच्या आखाड्यात जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथील उदयोन्मुख कुस्तीपटू ओम श्रीराम चौधरी याने ७० व्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदकाची कमाई केली. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ओमने मिळविलेल्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विभागीय यशानंतर राज्यस्तरावरही चमकदार कामगिरी

ओम श्रीराम चौधरी याने यापूर्वी नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. विभागीय स्तरावरील यशानंतर राज्यस्तरावरही त्याने आपल्या कुस्ती कौशल्याची आणि संघर्षशील वृत्तीची छाप उमटवली.

राज्यातील उत्कृष्ट कुस्तीपटूंशी स्पर्धा करत तृतीय क्रमांक मिळवणे ही त्याच्या नियमित सरावाची, मेहनतीची आणि आत्मविश्वासाची पावती मानली जात आहे. ओमच्या या यशामुळे कोळगाव परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एका यशाची भर

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातील गुणविकासालाही प्राधान्य दिले जाते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुस्ती, ज्युडो, वेटलिफ्टिंग, खो-खो आणि मैदानी स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशामुळे संस्थेची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम होत आहे.

ओमच्या यशामागे मार्गदर्शक शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक आणि विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. पर्यवेक्षक तथा आदर्श क्रीडा शिक्षक बी. डी. साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. रघुनाथ अरविंद पाटील आणि राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

ओम श्रीराम चौधरी याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब प्रतापराव पाटील, उपाध्यक्षा डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव दादासाहेब प्रशांत पाटील, विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. वळखंडे, प्रभारी कार्यवाहक मनोजकुमार पवार, पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.

राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले हे यश ओमच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. भविष्यातही त्याने उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन करून विद्यालय, कोळगाव आणि भडगाव तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी व्यक्त केल्या.

ओमच्या कांस्यपदकामुळे कोळगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version