Spread the love

नवदुर्गा विसर्जनासाठी प्रशासन सज्ज! तापी नदीकाठी जय्यत तयारी

पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून मिरवणूक मार्ग आणि विसर्जनस्थळांची पाहणी; राहुल नगर घाटासह यावल किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था

भुसावळ | प्रमोद पाटील

भुसावळ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि विसर्जनस्थळांची पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून सविस्तर पाहणी करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आणि नगरपरिषदेचे वैभव पवार यांच्यासह पोलीस प्रशासन व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तापी नदी परिसर आणि राहुल नगर घाट येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.

घरगुती मूर्ती व घट विसर्जनासाठी राहुल नगर घाट

घरगुती देवीच्या मूर्ती आणि घटांचे विसर्जन करण्यासाठी राहुल नगर घाट येथे व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.

सार्वजनिक मंडळांसाठी यावल किनाऱ्यावर व्यवस्था

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या देवीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी यावलच्या दिशेकडील तापी नदीकिनारी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी गर्दीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी हार, फुले आणि पूजेचे साहित्य नदीत टाकण्याऐवजी जमा करता यावे, यासाठी निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोहणारे, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि प्रकाशव्यवस्था

विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राहुल नगर घाट आणि यावलच्या दिशेकडील तापी नदीकिनारी प्रशिक्षित पोहणारे तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाशव्यवस्थाही करण्यात आली आहे.

शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

नवदुर्गा विसर्जन सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विसर्जनस्थळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे आणि नदीपात्रात उतरताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version