शिंदखेड्यात प्रा. वसंत हंकारे यांचे ‘न समजलेले माय-बाप’ विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान
सत्यशोधक युवा मंचाचा उपक्रम उत्साहात; सुमारे ३ हजार विद्यार्थी व पालकांची उपस्थिती, सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
शिंदखेडा | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, तसेच वाचनाची आवड, सामान्य ज्ञान आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने सत्यशोधक युवा मंच, शिंदखेडा यांच्या वतीने आयोजित व्याख्यान व सामान्य ज्ञान परीक्षा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी बिजासनी मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे तीन हजार विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे यांनी ‘न समजलेले माय-बाप’ या विषयावर प्रभावी व हृदयस्पर्शी व्याख्यान दिले. आई-वडिलांचे कष्ट, त्याग, संस्कार आणि मुलांच्या जीवनातील त्यांचे अनमोल स्थान यावर त्यांनी मार्मिक विवेचन केले. पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आयुष्यभर घेत असलेले कष्ट आणि मुलांनी त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सामान्य ज्ञान परीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमाच्या निमित्ताने १७ ऑक्टोबर रोजी शिंदखेडा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची जिज्ञासा, वाचनसंस्कृती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची वृत्ती विकसित व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
लहान गट (वयोगट ८ ते १० वर्षे)
-
प्रथम क्रमांक: लक्ष्मी रवींद्र निकम — मीराबाई गर्ल्स हायस्कूल, शिंदखेडा
-
द्वितीय क्रमांक: दिव्यांनी शिवाजी कोळी — नूतन माध्यमिक विद्यालय, धमाणे
-
तृतीय क्रमांक: जित जितेंद्र जाधव — स्वामी समर्थ हायस्कूल, शिंदखेडा
मोठा गट (वयोगट ११ ते १२ वर्षे)
-
प्रथम क्रमांक: हर्षली हिम्मत जाधव — जनता हायस्कूल, शिंदखेडा
-
द्वितीय क्रमांक: देवेंद्रसिंग केवळसिंग गिरासे — एम.एच.एस.एस. ज्युनिअर कॉलेज
-
तृतीय क्रमांक: ऋषिकेश मोहनसिंग गिरासे — एन. डी. मराठे विद्यालय, शिंदखेडा
महापुरुषांना अभिवादन; विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वाटप
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन उपयोगाच्या वस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजक व सहकार्य करणाऱ्यांचे योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यशोधक युवा मंचाचे प्रा. अनिल माळी, मुकेश माळी, प्रवीण माळी, योगेश माळी आणि केशव माळी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून बिजासनी पेट्रोलियम, शिंदखेडा येथील श्री. प्रवीण राजाराम महाले यांनी सहकार्य केले. तसेच अनिलजी वानखेडे, भिला बारकू माळी, श्री. बी. एल. सोनवणे, हितेंद्रजी जैन, सुमित जैन, श्री. उदय देसले, श्री. चेतन परमार, प्रा. दीपक माळी, सूरज देसले, श्री. रामकृष्ण माळी, श्री. युवराज माळी, श्री. योगेश बागुल आणि अॅड. प्रशांत जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
