आदिवासी भागात रोजगारनिर्मितीला चालना; ‘निसर्गदेवता वनौषधी शेतकरी उत्पादक कंपनी’चे उद्घाटन
कालीबेल येथे वनौषधी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा संकल्प; स्थानिक शेतकरी, महिला व युवकांना उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी
धडगाव प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने धडगाव तालुक्यातील कालीबेल येथे ‘निसर्गदेवता वनौषधी शेतकरी उत्पादक कंपनी’च्या कार्यालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. श्रावण वळवी आणि डॉ. प्रताप पाडवी यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या कंपनीमुळे परिसरातील वनौषधी शेतीला प्रोत्साहन मिळण्यासह शेतकरी, महिला आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वनौषधी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न
कालीबेल आणि परिसरात सफेद मुसळी, अश्वगंधा, शतावरी यांसारख्या विविध वनौषधींचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्थानिक शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम करणे आणि वनौषधींवर आधारित उत्पादनांच्या निर्मितीला चालना देणे हा कंपनीचा प्रमुख उद्देश आहे. वनौषधींपासून औषधनिर्मिती करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली.
आदिवासी युवकांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे
उद्घाटनप्रसंगी सुरत येथील उद्योजक तरुणभाई पटेल उपस्थित होते. आदिवासी युवकांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग-व्यवसायाकडेही वळावे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांना व्यवसायाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता यावे, यासाठी सुरतमध्ये व्यवसाय शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी कंपनीला तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. आत्मा कृषी विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले.
‘शेतकरी हाच व्यापारी’ ही भूमिका महत्त्वाची
मशरूम शेती व्यवसायाचे मार्गदर्शक तथा कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे आणि लीलाताई वसावे यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. राजेंद्र वसावे यांनी, “शेतकरी हाच व्यापारी, हे आपण समजून घेतले पाहिजे,” असे सांगत स्वतःच्या मशरूम शेतीतील अनुभव मांडले. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी शेतीपूरक उद्योग उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
भगर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रामसिंग वळवी यांनी व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव सांगितले. सेवानिवृत्त आयुक्त अरविंद वळवी यांनी सामाजिक विकासासंदर्भात मार्गदर्शन केले. सूर्यदर्शन उत्पादक कंपनीचे संचालक तथा सरपंच संदीप वळवी यांनी सीताफळ लागवड आणि पूरक उत्पादनांची माहिती दिली, तर धिरसिंग वळवी यांनी स्ट्रॉबेरी लागवड व विक्रीविषयी अनुभव कथन केला.
शेती, कायदे आणि जलसंधारणावर मार्गदर्शन
ॲड. अभिजीत वसावे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. डॉ. संजय पावरा यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचे महत्त्व विशद केले, तर सरपंच कनवर वळवी यांनी गावाच्या विकासाबाबत आपले विचार मांडले. DSC संस्थेचे अधिकारी आसिफ शेख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले.
या उपक्रमातून वनौषधी शेती, कृषीपूरक व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची जोड देऊन आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेतकरी, महिला आणि युवकांचा सहभाग
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार आमु आखा एक से कंपनीचे संचालक लालसिंग वळवी यांनी मानले. यावेळी मशरूम उत्पादक संदीप पाडवी (काठी), पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी, लक्ष्मण पाडवी, शिक्षक जमाना, दशरथ वसावे, वीरसिंग पावरा, शशिकांत वळवी, ग्रामपंचायत सदस्य, एलआयसी अधिकारी बारक्या पटले, खुमानसिंग वसावे, कुवरसिंग पराडके, विश्वास पाडवी आणि गुलाबसिंग पाडवी यांच्यासह परिसरातील शेतकरी, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
