भुसावळच्या शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामांतर; आता ‘ॲड. डी. के. चौधरी शासकीय तांत्रिक विद्यालय’ म्हणून ओळख!
राज्य शासनाची २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता; कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष ॲड. डी. के. चौधरी यांच्या कार्याचा गौरव
भुसावळ | प्रमोद पाटील, प्रतिनिधी : राज्य शासनाने राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयानुसार भुसावळ येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नामांतर ‘ॲड. डी. के. चौधरी शासकीय तांत्रिक विद्यालय, भुसावळ’ असे करण्यात आले आहे. शासनाच्या यादीतील अनुक्रमांक २२ नुसार झालेल्या या नामांतरामुळे भुसावळच्या सामाजिक, राजकीय आणि कामगार चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वर्गीय ॲड. दगडू काशीराम चौधरी यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. या निर्णयाचे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि कामगार वर्गाकडून स्वागत होत आहे.
सामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे ॲड. डी. के. चौधरी
स्वर्गीय ॲड. दगडू काशीराम चौधरी यांचा जन्म ६ जून १९२९ रोजी भुसावळ येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. भुसावळ येथील रेल्वे विभागात स्टेनोग्राफर म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी बऱ्हाणपूर येथून एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले.
रेल्वे सेवेत असताना त्यांनी रेल्वे कामगारांच्या प्रश्नांसाठी युनियनच्या माध्यमातून संघर्ष केला. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि युनियनचे अध्यक्षपदही भूषविले. पुढे रेल्वेची नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ वकिली आणि समाजसेवेला वाहून घेतले.
‘सामान्यांचा वकील’ म्हणून मिळवली ओळख
वकिलीच्या व्यवसायात असताना गरीब, गरजू आणि वंचित नागरिकांना मदत करण्यावर ॲड. चौधरी यांनी भर दिला. अनेक गरजूंची कामे त्यांनी विनामोबदला केल्याने त्यांची ‘सामान्यांचा वकील’ अशी ओळख निर्माण झाली. कामगार, गरीब आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला.
१९७५ मध्ये भुसावळ नगरपालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते बहुमताने विजयी झाले. पुढे १९८५ मध्ये जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आमदार म्हणूनही काम केले. नगराध्यक्षपदाच्या आणि आमदारकीच्या कार्यकाळात भुसावळच्या विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले जाते.
भुसावळच्या विकासात मोलाचे योगदान
भुसावळ शहराच्या विकासासाठी ॲड. डी. के. चौधरी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. नाल्यातील सांडपाण्याचे नियोजन, भूमिगत वाहिन्यांद्वारे सांडपाणी व्यवस्थापन आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या योजनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतल्याचे नमूद केले जाते.
पंचशील नगर, समता नगर आणि दीनदयाळनगर यांसारख्या वस्त्यांच्या निर्मितीशीही त्यांचे नाव जोडले जाते. श्यामप्रसाद मुखर्जी उद्यान आणि गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेले ‘झुणका-भाकर केंद्र’ या उपक्रमांमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
राजकीय पदावर असतानाही सामान्य नागरिकांशी असलेली नाळ त्यांनी कायम जपली. साधी राहणी, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली. १८ डिसेंबर २००९ रोजी त्यांचे निधन झाले; मात्र त्यांचे सामाजिक कार्य आजही स्मरणात आहे.
काय आहे शासन निर्णय?
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि त्यांच्यात विविध कौशल्ये विकसित करणे यासाठी शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या निर्णयानुसार भुसावळ येथील विद्यालयाला ॲड. डी. के. चौधरी यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थेच्या नावातून त्यांच्या सामाजिक कार्याची, कामगार चळवळीतील योगदानाची आणि भुसावळच्या विकासातील भूमिकेची आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
या नामांतरामुळे भुसावळच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कामगार वर्गासह नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
