Spread the love

धरणगावात कृष्ण-गीता नगरात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद!

मध्यरात्री १.१८ वाजता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे घर लक्ष्य; रोकड-दागिने सुरक्षित, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धरणगाव | प्रतिनिधी

धरणगाव शहरातील जी.एस. नगर परिसरातील मंगल कार्यालयाच्या मागे, नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ४७५ मधील कृष्ण-गीता नगर येथे मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. खर्दे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक तथा कृष्ण-गीता नगर कॉलनीचे अध्यक्ष बी. एम. सैंदाणे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनेत पाच संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. सुदैवाने घरातील रोकड अथवा दागिने चोरीला गेले नसल्याने मोठे नुकसान टळले. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मध्यरात्री १.१८ वाजता घरफोडी

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घरफोडीची वेळ निदर्शनास आली. दरम्यान, प्रभागाचे नगरसेवक किरण अग्नीहोत्री यांनी रात्री २ वाजून ४० मिनिटांनी कृष्ण-गीता नगरमधील रहिवाशांना दूरध्वनी करून मातोश्री नगर परिसरात काही संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती दिली. नागरिकांनी सावध व सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ही माहिती मिळताच कॉलनीतील रहिवासी पी. डी. पाटील आणि एस. एन. कोळी यांनी इतर सदस्यांना फोन करून सतर्क केले. याचदरम्यान पंकज मिस्तरी यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता, बी. एम. सैंदाणे यांच्या घरासमोरील लोखंडी गेट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संशय बळावला.

पोलिसांची अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी धाव

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कॉलनीचे सदस्य पी. डी. पाटील यांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांचे वाहन पहाटे ३ वाजेच्या सुमारास, अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी घटनास्थळाची पाहणी करून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटांचे ड्रॉवर उघडे होते, तर कपडे आणि साड्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. घरात शोधाशोध करण्यात आल्याचे या परिस्थितीवरून स्पष्ट झाले. मात्र, सुदैवाने घरातील रोकड आणि दागिने चोरीला गेले नसल्याचे समोर आले.

नागरिकांची सतर्कता; सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे

घटनेची माहिती मिळताच कॉलनीतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी लाठ्या-काठ्या घेऊन बाहेर पडत परिसरात सतर्कता दाखवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाच संशयितांचे चेहरे कैद झाल्याची माहिती असून, या फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे कृष्ण-गीता नगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कॉलनीतील नागरिक उपस्थित

घटनास्थळी पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्यासह कॉलनीचे उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, एस. एन. कोळी, जे. एस. पवार, ज्ञानेश्वर पवार, गोकुळ महाजन, महेंद्र बिवाल, चंदन बिवाल, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, भरत पाटील तसेच कॉलनीतील अनेक नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version