Spread the love

उत्सवाचा खर्च टाळून पहूरच्या नवदुर्गा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी!

दीड लाखांचा टँकर खरेदी करून गावासाठी मोफत पाणीपुरवठा सेवा सुरू; नवदुर्गा मित्र मंडळाचा आदर्शवत उपक्रम

पहूर, ता. जामनेर | प्रतिनिधी – गणेश वानखेडे

सण-उत्सवांमध्ये वर्गणी गोळा करून सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करण्याऐवजी गावकऱ्यांच्या मूलभूत गरजेला प्राधान्य देत पहूर पेठ येथील नवदुर्गा मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. मंडळाने स्वखर्चातून सुमारे दीड लाख रुपये खर्च करून पाण्याचा टँकर खरेदी केला असून, या टँकरद्वारे गावकऱ्यांना मोफत पाणीपुरवठा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शुक्रवारी जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

उत्सवापेक्षा लोकहिताला प्राधान्य

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथे साकारलेल्या या उपक्रमातून नवदुर्गा मित्र मंडळाने समाजहिताचा संदेश दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. उत्सवाचा खर्च मर्यादित ठेवून त्यातून गावकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी मदत उभी करण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी जामनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, बांधकाम सभापती आतिष झाल्टे, माजी नगरसेवक दीपक तायडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, सरपंच अब्बु तडवी, उपसरपंच शरद पांढरे, कविता देशमुख, रामेश्वर पाटील, साहेबराव देशमुख, राजू जाधव, भास्कर पाटील, संजय देशमुख, उपसभापती वासुदेव घोंगडे, प्रदीप लोढा, बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, ललित लोढा, गोकुळ कुमावत, लक्ष्मण गोरे, आर. बी. पाटील, श्यामराव सावळे, शैलेश पाटील, महेश पाटील, किरण पाटील, राजेश लोढा, सलीम शेख गणी, चेतन रोकडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पर्यावरणपूरक उत्सव आणि व्यसनमुक्तीचा संदेश

नवदुर्गा मित्र मंडळाने केवळ पाणीपुरवठ्यापुरते सामाजिक कार्य मर्यादित न ठेवता उत्सव पर्यावरणपूरक करण्यावरही भर दिला आहे. विसर्जन मिरवणुकीत फुलांचा वापर करून पर्यावरणपूरकतेचा संदेश देण्यात आला. तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, यासाठीही मंडळ प्रयत्नशील आहे.

मंडळाचे अध्यक्ष चेतन देशमुख, उपाध्यक्ष भैय्या देशमुख, सचिव गोकुळ बाळू देशमुख, धनंजय पाटील, गोकुळ देशमुख यांच्यासह सर्व सदस्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक होत आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे कशी उभी करता येतात, याचे उदाहरण पहूरच्या नवदुर्गा मित्र मंडळाने घालून दिले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश पाटील यांनी केले, तर डॉ. स्वराज देशमुख यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version