Spread the love

कर्णकर्कश सायलेन्सरच्या बुलेटधारकांवर वाहतूक विभागाचा दणका!

आठ दिवस बुलेट जप्तीची कारवाई; मॉडिफाइड सायलेन्सर काढण्याचा पोलिसांचा इशारा

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसवणाऱ्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मोठा आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटधारकांची वाहने आठ दिवसांसाठी जप्त करण्यासह संबंधित सायलेन्सर काढून जप्त करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाने दिली आहे. त्यामुळे बुलेटधारकांनी नियमबाह्य सायलेन्सर तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कमलाबाई कन्या शाळेजवळ कारवाई

शहरातील कमलाबाई कन्या शाळेजवळ शहर वाहतूक विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेटधारकांविरोधात कारवाई केली. बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठा आणि कर्णकर्कश आवाज काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना आवाजाचा त्रास

शहरातील विविध भागांत बुलेटच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक विभागाला अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटधारकांवर कारवाई केली जात आहे. संबंधित वाहनांची तपासणी करून नियमबाह्य सायलेन्सर काढून जप्त करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणे टाळावे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक विभागाने केले आहे.

या कारवाईदरम्यान शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस कर्मचारी पवन मंडले, अरविंद लोंढे, अजित शेख, विशाल मालचे, गौतम अहिरे, भागवत पाटील, रवींद्र ठाकरे, कैलास परदेशी, महेंद्र जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version