Spread the love

पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या; बोदवड तालुक्यात खळबळ!

येवतीतील धक्कादायक घटना; पहाटे ५ वाजता प्रकार उघडकीस, आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

बोदवड (प्रतिनिधी) :

जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती येथे पोटच्या मुलानेच आपल्या ६३ वर्षीय आईची धारदार व लोखंडी वस्तूंनी वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्काबाई पुरुषोत्तम वाघ असे मृत महिलेचे नाव असून, गणेश पुरुषोत्तम वाघ असे आरोपी मुलाचे नाव आहे. रविवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

जेवणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आईने जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून आरोपी गणेश वाघ याने नशेच्या अवस्थेत आईवर हल्ला केल्याचा उल्लेख गुन्ह्याशी संबंधित माहितीत करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

आरोपीने छोटी खुरपी किंवा विळा, लोखंडी दाताळे आणि लोणच्याची बरणी यांसारख्या वस्तूंनी आईच्या डोक्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अल्काबाई वाघ यांचा मृत्यू झाला.

बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपीचा भाचा रवींद्र महाजन याने बोदवड पोलीस ठाण्यात गणेश पुरुषोत्तम वाघ याच्याविरोधात तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे येवती परिसरात भीती आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येमागील कारण, घटनेची पार्श्वभूमी आणि अन्य बाबींचा तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version