विश्वकर्मा समाजाच्या कौशल्याला आधुनिक शिक्षणाची जोड द्या; नोकरी मागणारी नव्हे, नोकरी देणारी पिढी घडवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगावात विश्वकर्मा वंशीय समाजाचा जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा; ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, समाजरत्न, उद्योगरत्न व समाजभूषण पुरस्कारांचे वितरण
जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : “विश्वकर्मा समाजाला कष्ट, कला आणि कौशल्याची मोठी परंपरा लाभली आहे. या समाजाच्या हातात कौशल्य आहे; आता त्याला आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योगाची जोड देण्याची गरज आहे. आपल्या मुलांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनले पाहिजे. मुलांच्या हातात पदवी पाहण्यासाठी आई-वडील आयुष्यभर कष्ट करतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे. समाज किती मोठा आहे, यापेक्षा समाजातील किती कुटुंबे प्रगती करत आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण, संघटन आणि आर्थिक स्वावलंबनाची कास धरा,” असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव येथील हॉटेल वसंत हॉलमध्ये विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न, उद्योगरत्न आणि समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
पारंपरिक कौशल्यासोबत आधुनिक संधींचा स्वीकार करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, विश्वकर्मा समाजाची पारंपरिक व्यवसायांमधील कौशल्यपूर्ण कामगिरी ही मोठी ताकद आहे. या परंपरेचा अभिमान बाळगत आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील नव्या संधी स्वीकारल्या पाहिजेत. तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार करावा. त्यातून रोजगारनिर्मिती होऊन समाजाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते.
मुलांच्या शिक्षणासोबत मुलींच्या शिक्षणालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. आज गुणवंत म्हणून गौरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्षेत्रांत यश मिळवून उद्योजक म्हणूनही याच व्यासपीठावर सन्मानित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
समाजाच्या आधारस्तंभांचा पुरस्कारांनी गौरव
विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.
यामध्ये नाशिक येथील सूर्या ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंदराव सूर्यवंशी यांना समाजरत्न व उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रा. नागोराव पांचाळ आणि एम. टी. लुले यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पारोळ्याचे प्रवीण सुतार आणि धुळे येथील सुभाष वाडेकर यांचा गौरव करण्यात आला. उद्योजक पराग अहिरे (धुळे) आणि संजय हिरे (भुसावळ) यांनाही सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
तरुणांना उद्योजकतेचे मार्गदर्शन
कार्यक्रमात विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ (परभणी), नाशिक येथील सूर्या ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंदराव सूर्यवंशी आणि विजय मिस्तरी (पारोळा), सुभाष वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, उद्योगक्षेत्रातील उपलब्ध संधी ओळखाव्यात आणि स्वतःच्या कौशल्याच्या बळावर आर्थिक स्वावलंबन साधावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव प्रवीण शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक भागवत रुले यांनी केले. राज्य उपाध्यक्ष भगवान वाघ यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. त्यांनी उपस्थितांचे आभारही मानले.
जिल्हाभरातील समाजबांधवांची उपस्थिती
या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शहराध्यक्ष प्रशांत राऊत, युवा शहराध्यक्ष निलेश खैरनार, शहर सचिव सुरेश जाधव, रवींद्र जंजाळकर, मनोज जाधव, सागर जाधव, वैभव दांडेकर, धनराज रुले यांच्यासह जिल्हाभरातील विश्वकर्मा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव आणि तरुणांना उद्योजकतेचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे हा जिल्हास्तरीय मेळावा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीचा संदेश देणारा ठरला.
