Spread the love

धरणगाव रोटरी क्लबचा स्तुत्य शैक्षणिक उपक्रम!

महात्मा फुले हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी कार्डचे वितरण; अवघ्या ६५ रुपयांत शैक्षणिक ॲपची सुविधा

धरणगाव प्रतिनिधी :

धरणगाव : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी आणि दहावीच्या परीक्षेत त्यांना उत्तम यश मिळवून देण्यासाठी धरणगाव रोटरी क्लबच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शहरातील महात्मा फुले हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी कार्डचे वितरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त साधने उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक पी. डी. पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एम. बी. मोरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे सदस्य आणि महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी दिनेश माळी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

शैक्षणिक ॲपचा लाभ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

यावेळी दिनेश माळी यांनी विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी कार्ड आणि त्यासोबत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक ॲपची सविस्तर माहिती दिली. ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रश्नसंचांचा, अभ्यास साहित्याचा आणि मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. नियमित अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

१,५०० रुपयांचे शैक्षणिक ॲप केवळ ६५ रुपयांत!

धरणगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मनोज ठाकरे, सचिव रो. सुनील चौधरी, प्रोजेक्ट हेड रो. किरण पाटील, रो. दिनेश माळी आणि क्लबच्या सर्व सदस्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या शैक्षणिक स्टडी ॲपची मूळ किंमत १,५०० रुपये अधिक जीएसटी इतकी असताना, धरणगाव शहरातील विद्यार्थ्यांना ते केवळ ६५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारा रोटरी क्लब

धरणगाव रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, कर्करोग तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, आरओ वॉटर फिल्टर प्लांटची सुविधा आणि शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमांद्वारे क्लब समाजोपयोगी कार्यात योगदान देत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेला आयडियल स्टडी कार्ड वितरणाचा उपक्रम हा रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर वर्गशिक्षक एस. व्ही. आढावे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version