Spread the love

दुष्काळात कामांची दिरंगाई खपवून घेणार नाही; अपूर्ण पाणीपुरवठा योजना महिनाभरात पूर्ण करा!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; जिल्ह्यात एक लाख ‘जलतारा’ निर्मितीचे उद्दिष्ट, पाणी-वीज-चारा आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश

जळगाव, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच युद्धपातळीवर नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वीज, चारा व इतर सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जल जीवन मिशनसह ग्रामीण भागातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत. तसेच शासनाच्या जलतारा योजनेअंतर्गत जिल्ह्याला ५८ हजार जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट असले, तरी जिल्ह्यात एक लाख जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करावे. विकासकामांमधील दिरंगाई आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव व धरणगाव तालुक्यांतील विविध विभागांची प्रशासकीय आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत महावितरणने २४ तास सतर्क राहावे

बैठकीत पाणीपुरवठा, वीज, जलसंधारण, चारा उपलब्धता, पीकविमा, शेती, शेतरस्ते आणि विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठ्यातील अडचणी तातडीने दूर करण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर, केबल, फ्यूज आणि इतर बिघाड दुरुस्त करणारी आपत्कालीन यंत्रणा २४ तास सतर्क ठेवावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत. पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेल्या प्रलंबित वीजजोडण्यांबाबत महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी. कानळदा–किनोद आणि आव्हाणी–भोकणी दरम्यान नवीन वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीतून मंजुरी मिळविण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपूर्ण बंधारे, नाला खोलीकरण आणि पाझर तलावांच्या कामांना गती

जलसंधारण विभागाने अपूर्ण बंधारे, नाला खोलीकरण आणि पाझर तलावांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत. नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती प्राधान्याने करावी, जेणेकरून उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर आणि जलसाठा वाढविण्यास मदत होईल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

जिल्ह्याला जलतारा निर्मितीसाठी ५८ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी संभाव्य दुष्काळाचा विचार करून जिल्ह्यात एक लाख जलतारा निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवावे. त्यासाठी आवश्यक नियोजन करून कामाला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

चारा उपलब्धता आणि मूलभूत सुविधांकडे लक्ष द्या

संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने चारा लागवड आणि उपलब्धतेचे नियोजन करावे. शाळा व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी. पोषण आहाराच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष द्यावे. ग्रामपंचायती आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

९० टक्के काम पूर्ण झालेल्या योजना महिनाभरात कार्यान्वित करा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ९० टक्के काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांमधून एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लघुसिंचन विभागाने सिंचनाची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह पीकविम्याशी संबंधित प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विविध विभागांच्या कामांचा आढावा

बैठकीत संबंधित विभागप्रमुखांनी सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि अडचणींची माहिती सादर केली. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मूलभूत सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखून ‘मिशन मोड’वर काम करावे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले.

बैठकीला प्रांताधिकारी योगेश कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी व शीतल राजपूत, गटविकास अधिकारी सागर कोल्हे व चंद्रकांत बोडरे यांच्यासह महाऊर्जा, पंचायत समिती, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मोरे यांनी केले, तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version