Spread the love

अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता व्यक्तींचा शोध; अडावद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!

अपहृत मुली, महिला आणि पुरुषांना शोधून कुटुंबीयांच्या स्वाधीन; सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या पथकाचे यश

अडावद, प्रतिनिधी : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या तसेच अपहरण झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात अडावद पोलिसांना यश आले आहे. गेल्या अवघ्या तीन महिन्यांत विशेष शोधमोहीम राबवून पोलिसांनी तब्बल २० व्यक्तींचा शोध घेतला असून, त्यांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. या कामगिरीमुळे अडावद पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम

महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम राबविण्यात आली. अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने या प्रकरणांचा तपास केला.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध

अपहरणाचे दाखल गुन्हे तसेच बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली होती. तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळांची पाहणी, साक्षीदारांची चौकशी, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली.

सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजनबद्ध तपासामुळे तीन महिन्यांत २० व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले. यामध्ये अल्पवयीन मुली, महिला आणि पुरुषांचा समावेश असून, त्यांना सुरक्षितपणे नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील तायडे, पोलीस हवालदार जयदीप राजपूत, विनोद धनगर, संजय धनगर, शेषराव तोरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण शिरसाठ, अन्वर तडवी, भूषण चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांनी सहभाग घेतला.

कुटुंबीयांकडून पोलिसांचे आभार

बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध लागल्याने संबंधित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या प्रियजनांची सुखरूप भेट घडवून आणल्याबद्दल नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले. अडावद पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version