नांद येथे महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव संपन्न
शिक्षण सेवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार संजय मेश्राम यांना नागपुरे सरांचे निवेदन
नांद (उमरेड) : येथील समाज मंदिर, ढिवर मोहल्ला येथे श्री महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, नांद तर्फे सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शविणारे उमरेड क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांना शिक्षण सेवक कृती समिती, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष नागपुरे सर (कार्यरत: जि.प. नागपूर) यांनी शिक्षण सेवकांच्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर केले.
या विशेष प्रसंगी कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून आमदार संजय मेश्राम उपस्थित होते. त्यांच्याकडे शिक्षण सेवकांनी आपल्या विविध मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले. आमदार संजय मेश्राम यांना सादर केलेल्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांवर प्रकाश टाकण्यात आला:
१) कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्ती व लिखित आश्वासन: शिक्षण सेवकांचा सध्याचा सेवा कालावधी कमी करून त्यांना थेट कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात यावे. या संदर्भातील मागणी आगामी हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांकडून लिखित स्वरूपात मंजूर करून घ्यावी.
२) २०,००० रुपयांची अतिरिक्त मानधन वाढ: सध्याची वाढती महागाई पाहता शिक्षण सेवकांचे मानधन अत्यंत अपुरे आहे, त्यामुळे त्यांच्या मासिक मानधनात तातडीने २०,००० रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यात यावी.
३) रुजू दिवसापासून शासकीय कर्मचाऱ्यांचे लाभ: शिक्षण सेवकांना त्यांच्या सेवेच्या पहिल्या दिवसापासूनच इतर पूर्णवेळ शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा-सुविधा, भत्ते व इतर लाभ लागू करण्यात यावेत.
४) ‘टॅट’ (TAIT २०२५-२६) गुणवंत उमेदवारांवरील अन्याय दूर करा: शासनाच्या चुकीच्या व विस्कळीत जाहिरात प्रकाशनामुळे ‘टॅट’ परीक्षेत उच्च गुण मिळवूनही अनेक उमेदवारांना नाईलाजाने मिळेल त्या खालच्या वर्गावर नोकरी स्वीकारावी लागली, तर दुसरीकडे कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना वरच्या वर्गावर नियुक्ती मिळाली आहे. हा विसंगत अन्याय दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात पुन्हा अर्ज करण्याची कायदेशीर संधी देण्यात यावी. (कमी गुण घेणारा उपजिल्हाधिकारी तर जास्त गुण घेणारा नायब तहसीलदार कधी होतो का?)
मान्यवरांची उपस्थिती व ग्वाही:
हा सोहळा सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलालजी मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेनेचे राहुलजी पडोळे यांच्या प्रमुख अतिथ्यतेखाली संपन्न झाला. या वेळी जि.प. हायस्कूल नांद येथील शिक्षिका व सत्कारमूर्ती मा. श्रीमती वनिताताई रवींद्रजी पडगीलवार यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शंकर नागपुरे सर, गजेंद्रजी चाचेरकर, संजयजी केवट, दीपकजी वाघमारे, रवींद्रभाऊ शेंडे, शंकरजी डडमल, तसेच नांद ग्रामपंचायतीच्या सरपंच शितलताई राजुरकर, उपसरपंच मोहनजी धारणे, आशिषजी शिवरकर, विलासजी रुईकर व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी जयंतीच्या पवित्र प्रसंगी निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार संजय मेश्राम यांनी मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत, येत्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री आणि राज्य शासनाकडे यावर लिखित स्वरूपात ठोस पाठपुरावा करून शिक्षण सेवकांना व अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
