जीवनातील आनंदासाठी बुद्धांच्या मानवतावादी विचारांची गरज!
बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि असमाधानावर धम्मविचार हाच मार्ग; अकलूद येथे वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमात प्रा. डॉ. जतीन मेढे यांचे प्रतिपादन
संघरत्न सपकाळे | भुसावळ
बदलत्या जीवनशैलीमुळे दैनंदिन जीवनातील ताणतणाव वाढत असून, मानव आपली वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक मानसिक शांती हरवून बसला आहे. भौतिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणूस जगण्यातील आनंद गमावत असल्याचे चित्र समाजात दिसते. त्यामुळे जीवनातील निखळ आनंद प्राप्त करण्यासाठी बुद्धांच्या मानवतावादी आणि विज्ञाननिष्ठ विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले. अकलूद येथील संघर्ष विहारात आयोजित वर्षावास समाप्तीच्या धम्म प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
‘चला, धम्माने आपले जीवन आनंदी करू या’
‘चला, धम्माने आपले जीवन आनंदी करू या’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मेढे म्हणाले की, बुद्धांचा धम्म विज्ञाननिष्ठ जाणीव आणि विवेकपूर्ण आचरणाची शिकवण देतो. जीवनात दुःख आहे आणि त्या दुःखावर मात कशी करायची, याचा मार्ग बुद्धांनी सांगितला आहे.
स्वार्थ, मोह, गर्व, अहंकार आणि खोटेपणा यांचा त्याग करून माणसाने वास्तव स्वीकारत जीवन जगले, तर दुःख कमी होऊन आनंदाच्या दिशेने वाटचाल करता येते. स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीत असते. त्यासाठी वास्तवाचा स्वीकार आणि विवेकपूर्ण आचरण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी
यावेळी प्रमुख पाहुणे आयुध निर्माणी वरणगावचे वरिष्ठ अधिकारी धनेश्वर चौधरी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे ऐतिहासिक कार्य यांची सविस्तर माहिती दिली. बहुजन समाजाने बाबासाहेबांच्या विचारांतून आणि आचारांतून प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या जीवनात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.
फैजपूर महाविद्यालयाचे प्रा. दिलीप बोदडे यांनी बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील आणि अष्टांगिक मार्गाचे महत्त्व विशद केले. या तत्त्वांचे व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात आचरण केल्यास व्यक्तीसह संपूर्ण कुटुंबाचे जीवन मंगलमय होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
धम्मतत्त्वज्ञान आचरणात आणण्याचे आवाहन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद तायडे (गुरुजी) होते. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी जीवनातील धम्मतत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ विचार ऐकण्यापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष आचरणात आणावेत आणि त्यातून स्वतःचा विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शैलेंद्र अडकमोल सर यांनी केले. या धम्म प्रबोधन कार्यक्रमाला अकलूद येथील धम्म उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
