Spread the love

अहिल्यानगर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रामदास विजय व्यायामशाळेचे घवघवीत यश!

शाहू सांगळे यांना सुवर्णपदक, तर प्रथमेश मोरे यांना कांस्यपदक; कुस्ती क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

धुळे प्रतिनिधी : अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत धुळे येथील रामदास विजय व्यायामशाळेच्या मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली. या स्पर्धेत शाहू सांगळे याने ६३ किलो वजनगटात सुवर्णपदक, तर प्रथमेश मोरे याने ८२ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. दोन्ही मल्लांच्या यशामुळे रामदास विजय व्यायामशाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पदकांची कमाई

राज्यस्तरीय स्पर्धेत विविध भागांतील मल्लांशी सामना करताना शाहू सांगळे आणि प्रथमेश मोरे यांनी आपल्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि कुस्तीतील कौशल्याचे प्रदर्शन केले. शाहूने सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले, तर प्रथमेशने कांस्यपदक पटकावून व्यायामशाळेच्या यशात भर घातली.

दोन्ही खेळाडूंच्या या कामगिरीमुळे धुळे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन

या यशाबद्दल कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र राज्य संघाचे धुळे उपजिल्हाध्यक्ष पैलवान बापू अहिरे यांनी दोन्ही मल्लांचे अभिनंदन केले. तसेच पैलवान दर्शन कुलकर्णी, पैलवान सोनू चौधरी, पैलवान ऋषिकेश सातभाई, पैलवान स्वप्नील सोनवणे, कृष्णा बाबा सूर्यवंशी आणि निक्की काळे यांनीही शाहू सांगळे व प्रथमेश मोरे यांचे कौतुक करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशामुळे दोन्ही मल्लांच्या पुढील वाटचालीस नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या कामगिरीचे क्रीडाप्रेमींकडून स्वागत होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version