Spread the love

धुळ्यात वर्षावास समापन ‘महाप्रवरणा’ सोहळा उत्साहात संपन्न!

अश्विन बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना व प्रबोधन कार्यक्रम; भन्ते धम्मज्योती आणि श्यौराजसिंह यांचे मार्गदर्शन

धुळे | प्रतिनिधी

अश्विन बुद्ध पौर्णिमा आणि बुद्धाब्द २५७० निमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या धुळे जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष प्रसेनजीत चव्हाण, गौतम भाऊ सपकाळे आणि परिवाराच्या वतीने वर्षावास समापन ‘महाप्रवरणा’ सोहळ्यानिमित्त धम्मदेसना व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक ५ येथे पूज्य भन्ते धम्मज्योती (भिक्खू संघ) यांच्या मंगलमय उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते आप्पासाहेब एस. यू. तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील बहुजन प्रचारक श्यौराजसिंह, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र आण्णा महाले, बी. टी. अहिरे सर, देविदास आण्णा जगताप, सुरेश आण्णा लोंढे, प्रभाकर दादा खंडारे, राजू माईनकर, अशोक चौगुले, मनोहर मोरे (चाळीसगाव) आणि एकनाथ ढिवरे (चोपडा) उपस्थित होते.

महामानवांच्या प्रतिमांचे पूजन; त्रिसरण-पंचशील ग्रहण

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवर तसेच आयोजक प्रसेनजीत चव्हाण, गौतम सपकाळे, भूषण सपकाळे, केतन सपकाळे आणि परिवारातील सदस्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ बौद्धाचार्य पोपटराव मोहिते यांनी उपस्थितांना त्रिसरण-पंचशील दिले.

पूज्य भन्ते धम्मज्योती यांनी धम्मदेसनेतून शील, सदाचार आणि नैतिकतेचे महत्त्व विशद केले. तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा उपासक-उपासिकांना सुखमय आणि शांततापूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा आहे. जीवनात नैतिक मूल्यांचा अंगीकार करून सदाचाराने वाटचाल करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

संविधानिक हक्क आणि संत-महापुरुषांच्या विचारांवर प्रबोधन

प्रमुख अतिथी श्यौराजसिंह यांनी तथागत भगवान बुद्धांनंतर होऊन गेलेल्या संत-महापुरुषांचे जीवनकार्य आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान यावर प्रकाश टाकला. भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना दिलेले हक्क, अधिकार आणि समानतेची मूल्ये याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमातून बुद्धांच्या विचारांचा, समता-बंधुतेचा आणि संविधानिक मूल्यांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास ज्येष्ठ आंबेडकरी नेते अण्णासाहेब वाल्मिकराव दामोदर (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), हरिश्चंद्र आण्णा लोंढे, मुरलीधर लोकरे, रामभाऊ सोनवणे, संजय वाडेकर, संजय शेंडे, सुनंद भामरे, मधुकर निकुंभ, राजू आप्पा अहिरे, अशोक कोरे, मोहन सूर्यवंशी, भटू भाऊ वाघ, भानुदास दादा भवरे, लक्ष्मण दादा खैरनार, सादिक बेग, राजेंद्र सोनवणे, चंद्रकांत थोरात, प्रदीप पानपाटील, मदनभाऊ बाविस्कर, कैलास नाना महाले, विश्वासभाऊ बागुल, मनीष पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे, अशोक (भाऊ) मगीडकर, मनोज शिरसाठ, आनंद शिंदे, नारायण तायडे, राहुल अवचार, आनंद तायडे आणि अशोक शिरसाठ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेचे पदाधिकारी नानाजी अहिरे, प्रभाकर वाघ (देऊर), उत्तरेश्वर गायकवाड, भगवान वाघ, रविकर बागुल, शिवनाथ सोनवणे, यशोदाताई बागुल, सारंगाताई तायडे, हिराताई महाले, यशोदाताई सपकाळे, वैशालीताई चव्हाण, शैलाताई भवरे, अनिताताई रामराजे, आशाताई पवार, कमलताई मोरे, सुहास रामराजे, राहुल मोरे, अनिल केदार, सुनील मोरे, विनोद केदार, विशाल केदार, सचिन बिर्हाडे, विठ्ठल अहिरे, सदाशिव शिंदे, किशोर अहिरे आणि राजदीप आगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मेहुणबारे, वराड, चोपडा, चाळीसगाव आणि परिसरातील धम्म उपासक-उपासिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक व बौद्धाचार्य अशोक भाऊ शिरसाठ यांनी केले, तर राजू माईनकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेचे तसेच अमर नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version