शिंदखेड्यात बालाजी रथोत्सवात कोयत्याने दहशत; तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
भाविकांमध्ये दहशत निर्माण केल्याचा आरोप; संशयिताकडून कोयता जप्त, हत्यार कुठून आणले याचा तपास सुरू
धुळे | प्रतिनिधी
शिंदखेडा शहरात भगवान बालाजींच्या रथोत्सवाला गालबोट लावणाऱ्या घटनेत कोयता भिरकावत भाविकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून शिंदखेडा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. रोशन एकनाथ चौधरी (वय २३, रा. बडगुजर गल्ली, शिंदखेडा) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ ऑक्टोबर रोजी शिंदखेडा शहराचे आराध्य दैवत असलेल्या भगवान बालाजींचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. मात्र, उत्सवाच्या वातावरणात एका तरुणाने कोयता भिरकावत दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित रोशन चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कोयताही जप्त करण्यात आला आहे. संबंधित हत्यार त्याने कुठून आणले आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याचा पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
धार्मिक उत्सवाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
