Spread the love

पुतळा जाळण्यापूर्वीच दादा भुसेविरोधी आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

धुळ्यात सकल मराठा समाजाचा तीव्र निषेध; शिवतीर्थ चौकातून महापालिकेकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी परिसर दणाणला

धुळे | प्रतिनिधी

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात धुळ्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला. जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी करत समाजाच्या वतीने भुसे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. धुळे दौऱ्यावर आलेल्या दादा भुसे यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

विरोधी पक्षनेत्याच्या कार्यक्रमासाठी मंत्री दादा भुसे धुळ्यात आले होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी शिवतीर्थ चौकातून भुसे यांचा पुतळा घेऊन महापालिकेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना मध्येच रोखले आणि त्यांना ताब्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘एक मराठा, लाख मराठा’चा नारा दिला.

नेमके काय आहे प्रकरण?

मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची माफी मागावी, असे वक्तव्य शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्याचे सांगण्यात येते. या वक्तव्यावरून मराठा समाजात नाराजी पसरली असून, भुसे यांनी जरांगे पाटील यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दादा भुसे धुळे दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळताच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधाची भूमिका घेतली. त्यानुसार पुतळा घेऊन आंदोलनासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले. त्यामुळे धुळ्यात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित

या आंदोलनात सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, भैया शिंदे, भानुदास चौधरी, विजय चव्हाण, दीपक रौंदळ, अर्जुन पाटील, उल्हास पाटील, शाम रायगुडे, किशोर वाघ, संतोष लकडे, प्रफुल माने, गोविंद वाघ, प्रभाकर वाघ, वामन मोहिते आणि राकेश भोसले यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version