ममुराबादच्या पाणीप्रश्नावर तापी नदीपात्रात पाहणी; जलसंकट निवारणासाठी उपसरपंच विलास सोनवणे यांचा पुढाकार
प्रशासनाच्या सहकार्याने जेसीबीद्वारे नदीपात्रात कामे; गावाला नियमित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना गती
ममुराबाद | वार्ताहर
ममुराबाद गावाला सुरळीत आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रामपंचायत आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. गावातील पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन उपसरपंच विलास सोनवणे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रयत्नांतून तापी नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामे करण्यात आली.
गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने उपसरपंच विलास सोनवणे यांनी प्रशासक श्री. दांडगे आणि ग्रामविकास अधिकारी श्री. महाजन यांच्यासमवेत तापी नदी परिसराला भेट दिली. यावेळी नदीपात्रातील पाण्याची स्थिती आणि पाणी आणण्याच्या मार्गाची पाहणी करण्यात आली. तसेच जेसीबीच्या साह्याने नदीपात्रात आवश्यक कामे करून ममुराबाद गावासाठी पाण्याचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या पाहणी व कामाच्या वेळी ग्रामपंचायत आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर सावळे, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी बुधा सोनवणे, नितीन देवरे, रमेश सोनवणे तसेच शरद पाटील यांनी उपस्थित राहून कामात योगदान दिले.
गावकऱ्यांना नियमित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी उपसरपंच विलास सोनवणे यांनी दाखवलेली तत्परता आणि घेतलेला पुढाकार याबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. या उपाययोजनांमुळे ममुराबादचा पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
