Spread the love

जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत हाच यशाचा मंत्र! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला ४०० हून अधिक युवक-युवतींचा प्रतिसाद; ११ सौरऊर्जेवर चालणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण

पाळधी, जळगाव | दि. ३० ऑक्टोबर | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि कर्तृत्वाची कमतरता नाही. त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शन, संधी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची. आयुष्यात मोठी स्वप्ने पाहा; मात्र ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड द्या. सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. त्यामुळे पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या युवक-युवतींनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून जिद्दीने तयारी करावी, असे प्रेरणादायी आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पाळधी येथे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला धरणगाव तालुक्यासह परिसरातील ४०० हून अधिक युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधी पोलीस दूरक्षेत्रात बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पणही करण्यात आले. या यंत्रणेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

मैदानी सरावासोबत लेखी परीक्षेची तयारीही महत्त्वाची

युवकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पोलीस भरतीसाठी दररोजच्या मैदानी सरावासोबतच लेखी परीक्षेच्या अभ्यासालाही महत्त्व द्यावे. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवण्याऐवजी तो वेळ स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी वापरावा. स्पर्धा मोठी असली तरी मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश मिळवता येते. ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून, युवकांनी या संधीचे यशात रूपांतर करावे, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रास्ताविकातून पोलीस भरती प्रक्रिया, मैदानी व लेखी परीक्षा, आवश्यक तयारी आणि प्रशिक्षण शिबिराचा उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली. शिबिरात तज्ज्ञांनी उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.

स्व. आर. आर. आबांच्या आठवणींना भावनिक उजाळा

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या आठवणींना भावनिक उजाळा दिला. आज गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांतील मुले-मुली पोलीस दलात भरती होऊन आपल्या आई-वडिलांची स्वप्ने साकार करीत आहेत. याचे श्रेय स्वर्गीय आर. आर. आबांना जाते, असे त्यांनी नमूद केले.

कष्टकऱ्याचे मूल जेव्हा पोलीस गणवेश परिधान करते, तेव्हा तो केवळ त्या तरुणाचा विजय नसतो, तर आई-वडिलांच्या घामाचा आणि त्यागाचा सन्मान असतो. प्रामाणिक कष्ट कधीच वाया जात नाहीत. एक दिवस त्या कष्टांचे चीज निश्चितच होते, अशा भावनिक शब्दांत त्यांनी युवक-युवतींना प्रेरणा दिली.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत शुगरवाल, धरणगावचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले, तर आभार अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विनायक कोते यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version