हिंगणघाटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र!
रंगीबेरंगी रोषणाई, आकर्षक कारंजे आणि संसद भवनाच्या धर्तीवरील वास्तुरचना; रात्रीच्या प्रकाशझोतात उजळतो महामानवांचा पुतळा
हिंगणघाट | शहर प्रतिनिधी – प्रकाश झोडे
हिंगणघाट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, कारंज्यांतून उडणारे रंगीबेरंगी पाण्याचे तुषार आणि देखणी वास्तुरचना यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. या मनमोहक दृश्यामुळे नागरिकांची या चौकाला भेट देण्यासाठी गर्दी होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले असून, संसद भवनाच्या धर्तीवरील वास्तुरचनेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेला हा परिसर विशेष लक्षवेधी ठरत आहे. रंगीबेरंगी कारंजे आणि प्रकाशझोतातील पुतळ्याचे दृश्य नागरिकांना आकर्षित करीत आहे.
आमदार निधीतून सौंदर्यीकरणाचे काम
या सौंदर्यीकरणाचे काम हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या आमदार निधीतून पूर्ण करण्यात आले आहे. या विकासकामामुळे चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. परिसराला मिळालेल्या आकर्षक स्वरूपाबद्दल आमदार समीरभाऊ कुणावार यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
बाबासाहेबांना अभिवादन करताना मनाला मिळते समाधान
या परिसराला भेट देणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रात्रीच्या वेळी येथे येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मनाला वेगळीच शांतता आणि समाधान मिळते, असे नागरिकांनी सांगितले.
बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात अनेक दुःखांचा आणि संघर्षांचा सामना करून समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या संघर्षाची आणि महान कार्याची आठवण ठेवून त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे येतो, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
सौंदर्यीकरणासोबत विचारांचेही स्मरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण केवळ आकर्षक रोषणाई आणि वास्तुरचनेपुरते मर्यादित नाही, तर ते महामानवांच्या विचारांचे स्मरण करून देणारे ठिकाण ठरत आहे. प्रकाशझोतात उजळलेला पुतळा, रंगीबेरंगी कारंजे आणि देखणा परिसर यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. नागरिकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनण्याबरोबरच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे प्रेरणादायी स्थान ठरत आहे.
