देशात अराजकता माजविणाऱ्या विघातक शक्तींना उलथवून टाका!
पालकमंत्री जयकुमार रावल यांचा इशारा; भाजपतर्फे धुळ्यात ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रा
धुळे | प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्ष आणि परकीय शक्तींकडून संविधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज्याचे पणनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केला. केंद्र सरकार उलथवून टाकण्यासह देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न जनतेच्या पाठिंब्याने हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
एसआयआर मोहिमेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी (ता. ३०) धुळ्यात ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रा काढण्यात आली. आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेली ही पदयात्रा जमनालाल बजाज रोडपर्यंत काढण्यात आली. पदयात्रेच्या समारोपप्रसंगी पालकमंत्री रावल बोलत होते.
यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धरती देवरे, स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एसआयआर मोहिमेवरून विरोधकांवर टीका
पालकमंत्री रावल म्हणाले की, निवडणूक आयोगाने यापूर्वी देशात १२ वेळा विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असून, त्यापैकी बहुतांश वेळा काँग्रेस सत्तेत असताना ही प्रक्रिया पार पडली. त्यावेळी या मोहिमेवर आक्षेप घेण्यात आले नव्हते. निवडणूक आयोग ही स्वतंत्र आणि स्वायत्त घटनात्मक संस्था असून, तिच्या निर्णयांमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. आताही त्याच प्रक्रियेअंतर्गत एसआयआर मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकांमधील पराभव स्वीकारण्याऐवजी विरोधकांकडून केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआरला विरोध करून देशात बेकायदेशीररीत्या दाखल झालेल्या घुसखोरांना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला.
फेक नॅरेटिव्ह आणि आंदोलनांद्वारे अस्थिरता निर्माण करण्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची गेल्या दशकात झालेली प्रगती काही शक्तींना सहन होत नसल्यामुळे देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रावल यांनी केला. परकीय शक्तींकडून निधीपुरवठा, फेक नॅरेटिव्ह, टूलकिट आणि मीडिया कॅम्पेनिंगच्या माध्यमातून देशात संभ्रम आणि अशांतता निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.
सशस्त्र दलांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणे, संसदेचे कामकाज विस्कळीत करणे, प्रसारमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर टीका करणे, सर्वोच्च न्यायालय आणि ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करणे, तसेच आता निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांवर प्रश्न उपस्थित करणे, या माध्यमातून घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
चौकट : लोकशाही कमकुवत करण्याचे प्रयत्न हाणून पाडू!
देशातील जनतेचा विकासकामांच्या माध्यमातून विश्वास संपादन करण्याऐवजी विरोधकांकडून निवडणुकीतील पराभवाचे खापर घटनात्मक संस्थांवर फोडले जात असल्याचा आरोप पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केला. देशातील जनता हे सर्व पाहत असून, विरोधकांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘राष्ट्र प्रथम’ ही भावना देशातील जनतेच्या मनात असून, अराजकतेच्या राजकारणाला आणि देशविघातक शक्तींच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी सर्व देशवासीयांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
