जिल्हा शल्यचिकित्सकांना अॅड. पंकज गोरे यांचा घेराव; २३१ कोटींच्या निधीपासून बांधकामांपर्यंत प्रश्नांचा भडिमार!
खरेदी, निविदा प्रक्रिया, रुग्णालयातील कामे आणि कोट्यवधींच्या खर्चाचा मागितला हिशेब; पारदर्शक चौकशीसाठी राज्यस्तरीय अथवा विभागीय त्रिसदस्यीय समिती नेमण्याची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयातील विविध विकासकामे, वैद्यकीय साहित्य खरेदी, निधीचा विनियोग आणि बांधकामांच्या गुणवत्तेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना महाराष्ट्र सहसचिव अॅड. पंकज गोरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. चौकशी समितीच्या अहवालाचा संदर्भ देत २४ मे २०२२ रोजी मंजूर झालेल्या २३१ कोटी रुपयांच्या निधीपासून ते विविध कोट्यवधींच्या बांधकामांपर्यंतच्या खर्चाचा सविस्तर तपशील सादर करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित खर्चाची बिले, व्हाउचर, नोंदवह्या आणि निविदा प्रक्रियेची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
२३१ कोटींचा निधी नेमका कुठे खर्च झाला?
२३१ कोटी रुपयांचा निधी नेमका कुठे, किती आणि कोणत्या कामांसाठी खर्च करण्यात आला, असा थेट सवाल गोरे यांनी उपस्थित केला. या खर्चाशी संबंधित पासिंग बिले, व्हाउचर आणि रेकॉर्ड रजिस्टर दाखवावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच १ कोटी ९ लाख रुपयांची संगणक, प्रिंटर व इतर साहित्य खरेदी करण्यात आली. या साहित्याची सद्यस्थिती काय आहे, ते कोणत्या ठिकाणी वापरात आहे आणि मंजूर निधीचा पूर्ण विनियोग झाला आहे का, याची माहितीही त्यांनी मागितली.
निविदा प्रक्रिया आणि ठरावीक संस्थांना कामे देण्यावर प्रश्नचिन्ह
कोट्यवधी रुपयांची कामे मोजक्याच तीन ते चार संस्थांना आलटून-पालटून कशी मिळाली? संबंधित संस्थांना कामे देताना कोणती निविदा प्रक्रिया राबविण्यात आली? या संस्थांची संपूर्ण माहिती आणि निविदा प्रक्रियेतील कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी गोरे यांनी केली.
चौकशी समितीच्या अहवालात तांत्रिक बाबींच्या सखोल तपासणीसाठी वरिष्ठ स्तरावरून तांत्रिक अथवा विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, असा सवालही त्यांनी केला. खरेदीचे निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाले असतील, तर त्यांची चौकशीही वरिष्ठ स्तरावरूनच व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
३.६३ कोटींचे अंदाजपत्रक थेट ९.६४ कोटींवर कसे?
१०० खाटांच्या स्त्री व बाल रुग्णालयाच्या दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकातील वाढीवर गोरे यांनी प्रश्न उपस्थित केले. सुरुवातीला ३६३.८१ लाख रुपयांचे असलेले अंदाजपत्रक वाढून ९ कोटी ६४ लाख ६८ हजार ४५५ रुपयांपर्यंत कसे पोहोचले, याचा सविस्तर खुलासा त्यांनी मागितला.
या कामासाठी दाखविण्यात आलेल्या खर्चाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
-
मुख्य इमारतीची दुरुस्ती – ४ कोटी ५३ लाख ८१ हजार २१९ रुपये
-
नवीन प्रसाधनगृह – ३६ लाख ८ हजार ६८१ रुपये
-
बाहेरील गटार – १० लाख १७ हजार ६४७ रुपये
-
संरक्षण भिंत – ८९ लाख १३ हजार ५७६ रुपये
-
रस्त्याची दुरुस्ती – २० लाख ८ हजार ८६० रुपये
-
नवीन बाब व भाववाढ – ७५ लाख २९ हजार ६१२ रुपये
-
झाडे लावणे व इतर कामे – १४ लाख ५० हजार रुपये
-
जनरेटर व विद्युतीकरण – ९१ लाख २ हजार १४५ रुपये
-
पाणीपुरवठा – ३६ लाख ३३ हजार ५७४ रुपये
याशिवाय स्त्री रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणेसाठी ३ कोटी ४५ लाख ३६ हजार ९७१ रुपये खर्च करण्यात आल्याचे नमूद करत, एवढा खर्च होऊनही अनेक दिवस वातानुकूलित यंत्रणा बंद का होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या खर्चाचा आणि यंत्रणेच्या सद्यस्थितीचा सविस्तर तपशील देण्याची मागणी केली.
कार्डियाक कॅथलॅब आणि आयसीयूच्या सुविधांबाबत सवाल
१८ कोटी १५ लाख ३७ हजार ५०० रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या कार्डियाक कॅथलॅब युनिटचा प्रत्यक्ष किती रुग्णांना लाभ झाला? सध्या या युनिटमध्ये किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत? याची आकडेवारी सादर करावी, अशी मागणी गोरे यांनी केली.
आयसीयूसाठी १९ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये मंजूर झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून समोर आल्याचा उल्लेख करत, कोट्यवधी रुपये खर्चूनही पहिल्याच पावसात आयसीयू विभागात गळती कशी लागली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या गंभीर बाबीबाबत चौकशी समितीच्या अहवालात समाधानकारक स्पष्टीकरण नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
संरक्षण भिंतीला तडे; जेसीबीच्या धक्क्याचा पुरावा मागितला
नवीन बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला सुमारे दहा फुटांचा मोठा तडा गेल्याची बाब उपस्थित करत गोरे यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा तडा जेसीबीच्या धक्क्यामुळे पडल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आल्याचा उल्लेख करत, त्यासंदर्भातील पुरावा सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याच ठिकाणी पुन्हा बारीक तडा कसा गेला? कामाची तांत्रिक तपासणी झाली आहे का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
प्रत्यक्ष पाहणीसाठी तारीख आणि वेळ द्या!
रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी खरेदी करण्यात आलेली यंत्रसामग्री, विविध बांधकामे, नूतनीकरणाची कामे आणि इतर सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी अॅड. गोरे यांनी केली. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी निश्चित तारीख व वेळ कळवावी. त्याच दिवशी प्रत्येक कामावर झालेल्या खर्चाचा सविस्तर लेखाजोखा, बिले, व्हाउचर आणि संबंधित नोंदवह्या उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी
या सर्व प्रकरणांची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी वरिष्ठ स्तरावर तातडीने पत्रव्यवहार करून आरोग्य आयुक्तांकडे त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याची मागणी करावी. अन्यथा आपण स्वतः राज्यस्तरावर ही मागणी करू, असा इशाराही अॅड. पंकज गोरे यांनी दिला.
यावेळी निलेश चौधरी, पवन सरग, ज्ञानेश्वर देवरे, गोकुळ येलमामे, सिद्धेश गोरे, विक्की गर्ग, अक्षय लाड, पवन खांडरे, योगेश निकम आणि सौरभ जवराल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
