म्युनिसिपल हायस्कूलमध्ये सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी!
राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेत विद्यार्थ्यांनी दिला देशप्रेमाचा संदेश
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे भारताचे लोहपुरुष, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, देशाची एकता आणि अखंडता जपण्याची सामूहिक शपथ घेतली.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सेवाज्येष्ठ शिक्षिका शालिनी बनसोडे यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही महान नेत्यांना विनम्र अभिवादन केले.
सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या कार्याचा जागर
याप्रसंगी डॉ. प्रदीप साखरे, एस. टी. चौधरी आणि मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता व अखंड भारताच्या निर्मितीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची माहिती दिली.
तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना देशाच्या माजी पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, देशाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि भारतीय इतिहासातील त्यांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ
आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान न घेता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. देशाची एकता, अखंडता, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन मार्गदर्शनातून करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता तसेच देशाची एकता व अखंडता जपण्याची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
