टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; ७ ते ८ रुपये किलो भावाने उत्पादन खर्चही वसूल होईना!
पावसाची दडी आणि वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटोचे नुकसान; हताश शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला माल, विशेष आर्थिक पॅकेजची मागणी
धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरटेक येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहेत. पावसाने मारलेली दडी आणि वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो वेळेआधीच पिकून खराब होत आहेत. त्यातच बाजारात व्यापाऱ्यांकडून अवघा ७ ते ८ रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.
चार एकर शेतीसाठी लाखोंचा खर्च; उत्पन्नात मोठी घट
बोरटेक येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी स्वप्निल सुधाकर जाधव यांनी चार एकर क्षेत्रात टोमॅटो लागवडीसाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले. मात्र प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले असून अपेक्षित उत्पन्नातही घट झाली आहे. एकीकडे शेतीसाठी केलेला मोठा खर्च आणि दुसरीकडे बाजारात मिळणारा अत्यल्प दर यामुळे त्यांच्यासह परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
व्यापाऱ्यांची पाठ; रस्त्यावर टोमॅटो फेकण्याची वेळ
लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने आणि माल विक्रीतून खर्चही निघत नसल्याने हताश शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आणि गुंतवणुकीचे मोल बाजारपेठेत मिळत नसल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांची विशेष आर्थिक पॅकेजची मागणी
हवामानातील प्रतिकूल बदल आणि बाजारभावातील घसरण या दुहेरी संकटामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने बोरटेकसह परिसरातील टोमॅटो उत्पादकांच्या नुकसानीची दखल घेऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत करावी, अशी मागणी होत आहे.
