Spread the love

विकासकामांच्या अभावामुळे माळेगाव पिंपरीतील ग्रामस्थ आक्रमक!

आठ दिवसांत कामे सुरू न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून धरणे आंदोलनाचा इशारा; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

माळेगाव पिंपरी / सोयगाव | प्रतिनिधी : शिवराम जाधव

ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव पिंपरी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या जनरल व दलित वस्त्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत विकासकामे झाली नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा आणि युवकांसाठी आवश्यक सुविधांच्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. आठ दिवसांत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात जनरल व दलित वस्तीतील मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल साचत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पक्क्या गटारी व नाल्यांची बांधणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी देऊन नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच गावातील प्रत्येक चौकात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी बसवावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

युवकांसाठी वाचनालय आणि व्यायामशाळेची मागणी

गावातील युवकांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी आवश्यक पुस्तकांसह सुसज्ज सार्वजनिक वाचनालय मंजूर करावे. तसेच युवकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिम किंवा व्यायामशाळा उभारावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निकृष्ट विकासकामांच्या चौकशीची मागणी

ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदार अविनाश पाटील यांनी केलेली काही विकासकामे मंजूर अंदाजपत्रकानुसार झालेली नसून त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामांची तांत्रिक तपासणी करून चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदाराला यापुढील कामे देऊ नयेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या आरोपांची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आठ दिवसांची मुदत; अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप

या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती सोयगाव, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सरपंच व ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव पिंपरी यांना देण्यात आली आहे.

दिलेल्या मागण्यांवर आठ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर माळेगाव पिंपरी येथील समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version