Spread the love

अंबड तालुक्यात तहसीलदारांच्या आशीर्वादाने अवैध रेती उपसा सुरू? आंबेडकर जन मंचचा गंभीर आरोप!

रात्रंदिवस ४०० ते ५०० ट्रक-ट्रॅक्टरद्वारे उत्खनन होत असल्याचा दावा; विभागीय आयुक्तांकडे तक्रार, २ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर | जालना जिल्हा प्रतिनिधी – विलास म्हस्के

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा गंभीर आरोप आंबेडकर जन मंचने केला आहे. रात्रंदिवस ४०० ते ५०० ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक होत असून, हा प्रकार अंबडच्या तहसीलदारांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा खळबळजनक दावा संघटनेने केला आहे. या प्रकरणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

आंबेडकर जन मंचचे मुख्य संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष विलास म्हस्के, राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी डॉ. मनीषा घोष आणि मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडी शितल बाळू जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

गोरगरिबांवर गुन्हे, कथित रेती माफियांना अभय?

निवेदनात गोरी गंधारी येथील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गावातील गोरगरीब रोजंदारी करणाऱ्या तरुणांवर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात रेती उपशातून लाभ मिळवणाऱ्या कथित वाळू माफियांची नावे कारवाईतून वगळण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

तसेच तलाठी गवारे, मंडळ अधिकारी बमणावत आणि पोलीस पाटील निवास विनायक येटाळे (रा. गेवराई) हे गोरी गंधारी गावात वास्तव्यास नसल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.

बारा गावांमध्ये अवैध उत्खननाचा आरोप

अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध रेती उपसा सुरू असल्याचे नमूद करत संघटनेने पुढील गावांची नावे निवेदनात दिली आहेत.

  1. गोंदी पाथरवाला

  2. कुरण

  3. हसनापूर

  4. बळेगाव

  5. लक्ष्मीआई मळा, गोंदी

  6. बाबाची थडी, पाथरवाला

  7. शहागड

  8. गोरी गंधारी

  9. डोमलगाव

  10. साष्टपिंपळगाव

  11. आपेगाव

  12. बळेगाव

फक्त गोरी गंधारी येथे कारवाई करून चालणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी उत्खनन झाले आहे, त्या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून आधुनिक साधनांच्या साहाय्याने उत्खननाचे मोजमाप करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. निष्पाप गरीब नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी अवैध उत्खननातून लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

चौकशी करून कारवाई करा; अन्यथा आमरण उपोषण

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच अंबडच्या तहसीलदारांच्या भूमिकेचीही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर जन मंचने केली आहे.

मागण्यांची दखल घेऊन कारवाई न झाल्यास येत्या २ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील कथित अवैध रेती उपशाच्या आरोपांची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का आणि संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version