ग्रामीण भागातून साहित्य चळवळ चालवणे कौतुकास्पद! – प्रा. दिलीप फडके
साहित्य परिषदेच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात; आहुर्ली येथून सलग १५ वर्षे साहित्यिक चळवळ सुरू
नाशिक | जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ गायकर
शहरांमध्ये सुशिक्षित लोकांची संख्या मोठी असतानाही वाचन चळवळ टिकवणे जिकिरीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून संपादक नवनाथ गायकर आणि त्यांचे सहकारी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने साहित्य चळवळ चालवत आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार सा.वा.ना.चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी काढले.
इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथून संपादक नवनाथ अर्जुन पाटील गायकर यांच्या पुढाकारातून दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘साहित्य परिषद’ दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
साहित्यिक चळवळीचा १५ वर्षांचा प्रवास
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सा.वा.ना.चे पदाधिकारी संजय करंजकर, सोमनाथ मुठाळ, डॉ. धर्मा बोडके, ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत सावळीराम तिदमे, डॉ. भास्कर म्हसराळे, प्रदीप पाटील, सुहास टिपरे, नाशिक जिल्हाध्यक्ष माणिकराव गोडसे, सौ. विद्या पाटील, गणेश बर्वे, संजय आहेर आणि बिरारी ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात संपादक नवनाथ गायकर यांनी सलग पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेतला. अनेक अडचणींचा सामना करूनही ही चळवळ ठामपणे सुरू असून दिवसेंदिवस अधिक सशक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा
ग्रामीण भागात साहित्य आणि वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. साहित्य परिषद दिवाळी अंकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले, तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गिरी यांनी आभार मानले.
