सावळदबारा येथे वृद्ध दलित शेतमजुरावर जातिवाचक शिवीगाळ करीत जीवघेणा हल्ला!
लाकडी दांडक्याने डोक्यावर वार, ४८ हजार रुपये व मोबाईल हिसकावल्याचा आरोप; तब्बल ५२ दिवसांनंतर फर्दापूर पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल
फर्दापूर / सोयगाव | शिवराम जाधव
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे किरकोळ कारणावरून एका ६२ वर्षीय दलित शेतमजुराला जातिवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप असून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या प्रकरणी घटनेनंतर तब्बल ५२ दिवसांनी, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी फर्दापूर पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोलेरो अडवून हल्ला केल्याचा आरोप
पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर क्रमांक ०१८६/२०२६ नुसार, फिर्यादी मनोहर ओंकार जगताप (वय ६२, रा. सावळदबारा) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.४५ ते ७.३० वाजेच्या दरम्यान ते बोलेरो जीपने गावातून घराकडे जात होते. चक्रधर स्वामी चौकातून जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागील बखळ जागेजवळ आणि अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या बाजूला काही जणांनी त्यांचे वाहन अडविले.
त्यानंतर संबंधितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून संगनमताने अंगावर धावून येत जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच ‘तुला बघून घेतो’ अशी धमकी देत लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केला. या हल्ल्यात डोके फुटून गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय बोलेरो जीपच्या डिक्कीमध्ये ठेवलेले ४८ हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
उपचारानंतरही तक्रार दाखल होण्यास विलंब?
घटनेनंतर जखमी जगताप यांना प्रथम सोयगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथून रेफरल पत्र देऊन जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला; मात्र त्यांनी जामनेर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सुरुवातीला फर्दापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचा तसेच पोलीस पाटील आणि काही व्यक्तींनी दडपशाही केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या आरोपांबाबत स्वतंत्र अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घरावर दगडफेक झाल्यानंतर गुन्हा दाखल
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास पुन्हा आरोपींकडून त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री १०.३७ वाजता फर्दापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११९(१), ११८(१), ११५(२), १२५, १८९(२), १९१(२), १९०, ३५१(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मधील कलम ३(२)(va), ३(१)(r) आणि ३(१)(s) अन्वये १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर भाऊसाहेब करीत आहेत. घटनेमुळे सावळदबारा परिसरातील दलित समाजात संताप व्यक्त होत असून, संबंधित आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
