Spread the love

शाळेच्या दारात पोहोचले न्यायालय; विद्यार्थ्यांना मिळाले कायद्याच्या संरक्षणाचे बळ!

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’ उत्साहात संपन्न; पॉक्सो, सायबर सुरक्षा, बालविवाह आणि बालकामगार कायद्यांबाबत जनजागृती

भुसावळ | प्रतिनिधी

बालकांचे बालपण सुरक्षित, निर्भय आणि शोषणमुक्त करण्याच्या उद्देशाने भुसावळ तालुका विधी सेवा समिती व भुसावळ वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सुरक्षित बचपन अभियान’ या जनजागृती सप्ताहाचा समारोप नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे उत्साहात झाला.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच भुसावळ दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आदेशान्वये २६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश व्ही. डी. घागी होते. यावेळी ॲड. पुरुषोत्तम पाटील, श्याम शिंदे, रूपाली नेवे यांच्यासह न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पॉक्सो, सायबर सुरक्षेसह विविध कायद्यांची माहिती

या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या पॉक्सो कायदा २०१२, सायबर सुरक्षा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालकामगार प्रतिबंधक कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. मोबाईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडियावरील संभाव्य धोके, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बालकांवर अन्याय, अत्याचार किंवा शोषण झाल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक अथवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करून कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. ‘बोलो, बताओ, बचाओ’ या संदेशातून अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. विषयाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.

न्यायाधीश व मान्यवरांचा सत्कार

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक वसंत पी. सुलताने, ज्येष्ठ शिक्षक डॉ. प्रदीप साखरे आणि शिक्षिका शालिनी बनसोडे यांच्या हस्ते न्यायाधीश व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी एन. एच. राठोड, एस. टी. चौधरी, डी. के. भंगाळे, नाना पाटील, मनोज किरंगे, निलेश बोराडे, अरुण नेटके, संध्या धांडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, वरिष्ठ लिपिक प्रवीण चौधरी, शिपाई राजेंद्र बागुल, रोहन पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन एन. एच. राठोड यांनी केले.

बालसुरक्षा ही समाजाची सामूहिक जबाबदारी

बालकांचे संरक्षण ही केवळ पालक किंवा शाळेचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. न्यायालयीन यंत्रणेने थेट शाळेत पोहोचून विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्क, सुरक्षिततेची जाणीव आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्यामुळे ‘सुरक्षित बचपन अभियान’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, निर्भय आणि उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version