गाढोदा येथे वर्षावास प्रवचनमालेचा उत्साहात सांगता सोहळा; संतोष व शिला सपकाळे यांच्याकडून बुद्धविहारासाठी जागा दान!
गाढोदा महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण; धम्मप्रसारासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान
गाढोदा, जळगाव | प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा, जळगाव जिल्हा पूर्व अंतर्गत जळगाव तालुका शाखेच्या वतीने रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी गाढोदा येथील पंचशील नगर या धम्मनगरीत आयोजित वर्षावास प्रवचनमालेचा सांगता सोहळा उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात गाढोदा महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, संतोष सपकाळे आणि शिलाताई सपकाळे यांनी आपली राहती जागा बुद्धविहारासाठी दान देण्याची घोषणा करून धम्मकार्याला मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या दानशूर निर्णयाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण
महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे गुरुजी आणि महिला जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई अहिरे यांच्या हस्ते गाढोदा महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव तालुकाध्यक्ष राजेश नामदेव इंगळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप, धूप व पुष्पपूजेने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बुद्धवंदना करण्यात आली. जिल्हा हिशेब तपासनीस पी. डी. सपकाळे यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले. यावेळी राज्य, जिल्हा आणि तालुका पदाधिकारी, प्रवचनकार तसेच नूतन माजी श्रामणेर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रवचनकार व धम्मकार्यकर्त्यांचा गौरव
वर्षावास प्रवचनमालेत सुनीताताई वानखेडे, रविंद्र वानखेडे, लेखक उदय सपकाळे, बी. एस. पवार गुरुजी, केंद्रीय शिक्षिका ज्योतिताई भालेराव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराव वाघ, विद्याताई झनके, जयपाल धुरंधर, अशोक तिडके, रविंद्र मोरे आणि डॉ. प्रकाश वानखेडे यांच्यासह विविध मान्यवरांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
वर्षावास समारोपासाठी पाच हजार रुपयांचे रोख दान देणारे पेमाभाऊ सोनवणे, बुद्धविहारासाठी जागा दान करणारे संतोष सपकाळे व शिलाताई सपकाळे, धम्मविचार रुजविण्यासाठी योगदान देणारे पुष्पाताई सपकाळे व पी. डी. सपकाळे, तसेच कविताताई सपकाळे आणि गौतम सपकाळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
गाढोदा महिला ग्रामशाखेच्या योगदानासह संपूर्ण सन्मानचिन्हांचा खर्च उचलणाऱ्या वंदनाताई वानखेडे आणि प्रवचनकारांच्या प्रवासखर्चासाठी सहकार्य करणारे सागर सदावर्ते यांचेही उपस्थितांनी कौतुक केले.
धम्मविचार, सामाजिक एकतेचा संदेश
कार्यक्रमात डॉ. के. वाय. सुरवाडे गुरुजी, प्रा. डॉ. संजीव साळवे, रविंद्र वानखेडे, भीमराव पवार, बी. एस. पवार गुरुजी, उदय सपकाळे, बाबुराव वाघ आणि रविंद्र मोरे गुरुजी यांनी शुभेच्छापर व मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक एकता आणि संघटनात्मक कार्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. सपकाळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून राजेश नामदेव इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गाढोदा येथील उपासक-उपासिकांच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
या सोहळ्याला जिल्हा, तालुका व महिला शाखांचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, ग्रामशाखेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धविहारासाठी जागादानाची घोषणा आणि महिला ग्रामशाखेच्या फलकाचे अनावरण या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे गाढोदा येथील वर्षावास सांगता सोहळा विशेष ठरला.
