Spread the love

शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदाराच्या पोस्टरला राष्ट्रवादीकडून जोडे मारो आंदोलन!

आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाचा धुळ्यात निषेध; तात्काळ निलंबन करून कारवाई करण्याची जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांची मागणी

धुळे | प्रतिनिधी

शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. संबंधित आमदाराचे तात्काळ निलंबन करून सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केली. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांविषयीच्या विधानावरून संताप

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर प्रतिक्रिया उमटत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आंदोलनाची भूमिका घेतली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला.

निलंबन न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

आमदार संजय गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केली. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, शहराध्यक्ष नंदकिशोर यलमामे, जगन ताकते, वाल्मीक मराठे, संजय नेतकर, तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर, शिंदखेडा तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष वेंकटेश पाटील, धुळे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष कुणाल पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सरोज कदम, गायत्री पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version