आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्त सहभाग घ्यावा!
मुकुंद गोसावी यांचे आवाहन; पात्र रुग्णांना दर्जेदार उपचार मोफत देण्याचे योजनेशी संलग्न रुग्णालयांना निर्देश देण्याची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही नागरिकाला वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाच्या आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांनी घ्यावा. प्रत्येक पात्र कुटुंबाने आपले आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे आणि या योजनांच्या अंमलबजावणीत स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे अशासकीय सदस्य मुकुंद गोसावी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक
आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त अंमलबजावणीसंदर्भात जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पात्र रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार द्या!
या बैठकीत मुकुंद गोसावी यांनी योजनेशी संलग्न रुग्णालयांनी पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार दर्जेदार वैद्यकीय सुविधा आणि उपचार मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. योजनेचा लाभ घेताना रुग्णांना अनावश्यक त्रास किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
आयुष्यमान कार्ड काढण्यापूर्वी कागदपत्रे अद्ययावत करा
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. कार्ड काढण्यापूर्वी कुटुंबाची शिधापत्रिका डिजिटल स्वरूपात अद्ययावत करून घ्यावी. कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करून माहिती अपडेट करावी. तसेच आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकासंबंधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे गोसावी यांनी सांगितले.
पांढरी, केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका असलेल्या पात्र कुटुंबांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. यासाठी आरोग्य मित्र, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी सेंटर) तसेच रास्त भाव दुकानदार यांच्याकडून नागरिकांना मार्गदर्शन व सहकार्य मिळू शकते.
७० वर्षांवरील ज्येष्ठांनीही वय वंदना कार्ड काढावे
वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आयुष्मान वय वंदना कार्डचाही लाभ संबंधित ज्येष्ठांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कागदपत्रांअभावी योजनेचा लाभ मिळवताना अडचणी येऊ नयेत, यासाठी नागरिकांनी वेळेत आयुष्यमान कार्ड काढून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदविल्यास या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने योजनेची माहिती घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि आरोग्य सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुकुंद गोसावी यांनी केले.
