Spread the love

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पुस्तकांची अनोखी भेट!

‘वाढदिवसाला हारतुरे नको, सामाजिक हितासाठी पुस्तक हवे!’ – महेंद्र तायडे; गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण संस्थेतर्फे ‘शिवाजी कोण होते?’ ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप

धरणगाव | प्रतिनिधी

आजकाल वाढदिवस म्हटला की हारतुरे, पुष्पगुच्छ, फटाक्यांची आतषबाजी आणि मोठ्या खर्चाचे चित्र पाहायला मिळते. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन धरणगावात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पण बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य, धरणगाव यांच्या वतीने गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होते?’ या वैचारिक ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप करण्यात आले.

हारतुरे, फटाक्यांऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य

महाराष्ट्रात नैसर्गिक संकट आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च, हारतुरे, पुष्पगुच्छ, फटाके किंवा महागड्या भेटवस्तूंवर पैसा खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन गुलाबराव वाघ यांनी यापूर्वीच केले होते. वाढदिवसानिमित्त भेटवस्तू द्यायचीच असेल, तर विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणाऱ्या वह्या, पुस्तके आणि बॉलपेन यांसारख्या शैक्षणिक साहित्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

या आवाहनामागे केवळ वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा विचार नसून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती प्रत्येकाने संवेदनशील असावे, हा व्यापक सामाजिक हेतू होता. कारण वाढदिवसानिमित्त होणारा काही तासांचा आनंद संपून जातो; मात्र विद्यार्थ्यांच्या हातात दिलेले पुस्तक त्यांना आयुष्यभर ज्ञान आणि विचारांची शिदोरी देऊ शकते.

‘शिवाजी कोण होते?’ ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप

याच सामाजिक भावनेतून समर्पण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होते?’ या ग्रंथाच्या ५९ प्रतींचे वाटप करून गुलाबराव वाघ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमातून वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासोबतच वैचारिक जागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमावेळी समर्पण बहुउद्देशीय संस्थेचे राज्याध्यक्ष बापुसो. महेंद्र तायडे, जिल्हा भाजपचे नेते ॲड. संजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरखनाथ देशमुख, शिवसेना (उबाठा) जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र महाजन, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, शहरप्रमुख तथा नगरसेवक भागवत चौधरी, काँग्रेसचे नंदलाल महाजन, नगरसेवक मोनू शिरसाट, लक्ष्मण महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष माळी, विजय सोनवणे, शरद शिरसाट, अशोक झुंझारराव, संतोष सोनवणे, अजय सोनवणे, गोटू रोकडे, भैय्या धनगर, हिंमत पाटील, हेमंत माळी सर, आबासाहेब वाघ, राहुल रोकडे यांच्यासह समर्पण बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘वाढदिवसाचा आनंद ज्ञानदानातून!’

वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा हा उपक्रम धरणगावात चर्चेचा विषय ठरला. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानदान, वाचनसंस्कृती आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version