देगलूर तालुक्यात ‘संविधान जागृती अभियान’; ग्रामपंचायतींना सहकार्याचे निर्देश देण्याची बीडीओंकडे मागणी!
४७ ग्रामपंचायती आणि ४ शाळा-महाविद्यालयांत ५१ कार्यक्रम पूर्ण; नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान प्रत्येक गावात संविधान वाचनाचा उपक्रम राबविण्याचे नियोजन
देगलूर | प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे विचार गावागावांत पोहोचवून नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने नैतिक भीम क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट, सुंडगी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘गाव-गाव संविधान जागृती अभियान’ राबविण्यात येत आहे. १४ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या अभियानाचा कालावधी २ वर्षे ११ महिने १८ दिवसांचा आहे. या अभियानांतर्गत देगलूर तालुक्यात आतापर्यंत ४७ ग्रामपंचायती आणि ४ शाळा-महाविद्यालयांमध्ये असे एकूण ५१ कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीत संविधान वाचनाचे नियोजन
आगामी नोव्हेंबर २०२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत देगलूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दररोज एक ते दोन तास संविधान वाचन आणि जनजागृतीचे उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, काही ग्रामसेवक कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहत नसल्याने, फोन करूनही प्रतिसाद देत नसल्याने तसेच विविध कारणे सांगून कार्यक्रम टाळत असल्याने अभियानाच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
ग्रामसेवकांना सहकार्याचे निर्देश देण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालय संविधान वाचनासाठी दररोज एक ते दोन तास उपलब्ध करून द्यावे, अभियानाच्या कार्यकर्त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, योग्य समन्वय साधावा तसेच सर्व ग्रामसेवकांना सहकार्य करण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे विचार गावागावांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या अभियानाला पंचायत समिती प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित
निवेदन देताना तसेच अभियानाची माहिती देताना नैतिक भीम क्रांती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बालाजी कांबळे यांच्यासह मारोतीराव कांबळे, यशवंत सूर्यवंशी, जळबा वाघमारे, रमेश कांबळे भायेगावकर आणि शंकर कांबळे उपस्थित होते.
