Spread the love

धुळ्यात एसपींच्या उपस्थितीत कानठळ्या बसवणाऱ्या बुलेट सायलेन्सरचा आवाज बंद!

१४० मॉडिफाइड सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून नष्ट; शिवतीर्थ चौकात पोलिसांची धडक कारवाई, बुलेटचालकांना दणका

धुळे | प्रतिनिधी

शहरात कानठळ्या बसवणाऱ्या आणि ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई केली आहे. गेल्या २० दिवसांत विविध भागांतून जप्त करण्यात आलेले तब्बल १४० सायलेन्सर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ चौकात रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास

धुळे शहरातील विविध भागांत मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा त्रास वाढला होता. अचानक होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बालके तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करून संबंधित बुलेटचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

२० दिवसांत १४० सायलेन्सर जप्त

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शहर वाहतूक विभागाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार वाहतूक विभागाने गेल्या २० दिवसांत शहरातील विविध भागांत तपासणी व कारवाई करून मोठ्या आवाजाचे १४० बुलेट सायलेन्सर जप्त केले.

जप्त केलेले हे सायलेन्सर शिवतीर्थ चौकात रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे ध्वनिप्रदूषणाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित

या कारवाईप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कर्णकर्कश सायलेन्सरविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून स्वागत होत असून, भविष्यातही अशा प्रकारच्या नियमबाह्य बदलांवर सातत्याने कारवाई होण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version