डीसीपी शशिकांत सातव यांना जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे सस्नेह निमंत्रण!
आयोजकांची कार्यालयात सदिच्छा भेट; २८ व २९ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे साहित्य संमेलनाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर | शेख निसार :
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे डीसीपी (क्राईम ब्रँच) शशिकांत सातव यांची जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना जिल्हा मराठी साहित्य संमेलन २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यास विशेष उपस्थित राहण्याबाबत सस्नेह निमंत्रण देण्यात आले.
पोलीस प्रशासनातील योगदानाचा गौरव
या भेटीदरम्यान पोलीस प्रशासनातील शिस्त, कर्तव्यनिष्ठा, प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक बांधिलकी जपत जनहितासाठी कार्यरत असलेल्या शशिकांत सातव यांच्या कार्याचा आयोजकांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. समाजाच्या सुरक्षिततेबरोबरच साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांनाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सातव यांनी संमेलनाला उपस्थित राहून साहित्यिक चळवळीला प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
२८ व २९ नोव्हेंबरला साहित्य संमेलन
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवार, दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संमेलन मराठवाडा महसूल प्रबोधिनी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या साहित्यिक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आयोजकांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
या सदिच्छा भेटीप्रसंगी डॉ. डी. व्ही. खरात, डॉ. अभिनिता सावळे, डॉ. संगीता भालेराव आणि डॉ. अभिनीत भालेराव उपस्थित होते.
